कोल्हापूर : शासकीय लालफितीच्या कारभारामुळे मराठी चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या कितीतरी वृद्ध कलावंतांची मानधनाविना उपेक्षा झाली. आजही अनेक कलावंत तंत्रज्ञ विपन्नावस्थेत जीवन कंठत आहेत. अशा कलावंतांना आता नव्या वर्षाची भेट देत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने पेन्शन देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्यावर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत यासाठी काही हॉस्पिटलशीही टायअप करून कलावंतांना आरोग्य कवच देण्याची योजना अमलात आणली जाणार आहे. वाद आणि कोर्टकचेऱ्यांच्या प्रकरणात गेले वर्षभर वाया घालविलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची निवड झाली आहे. आपल्याला मिळालेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत शक्य तितके चांगले काम करण्याचा पाटकर यांचा मानस आहे. निवडीनंतर त्यांनी प्राधान्याने वृद्ध कलाकारांना मानधन आणि कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचे पहिले पाऊल म्हणून चित्रपट महामंडळाच्यावतीने हलाखीत जीवन कंठत असलेल्या वृद्ध कलावंत व तंत्रज्ञांना फूल न फुलाची पाकळी म्हणून मानधन / पेन्शन देण्यात येणार आहे. चित्रपट महामंडळाच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातून ही रक्कम देण्यात येणार आहे. ही योजना १ जानेवारीपासून अंमलात येणार आहे. या योजनेचा नको त्यांचा फायदा होऊ नये यासाठी कलावंतांचे वय पंचावन्नपेक्षा जास्त असावे, तसेच त्यांनी चित्रपटसृष्टीत ३० वर्षे काम केलेले असावे, अन्य कोणत्याही पेन्शन योजनांचा लाभ त्यांना मिळत नसावा, असे काही नियम व अटी घालण्यात येणार आहेत.वृद्ध कलावंतांना मानधन ही शासनाची योजना १९९८ सालापासून प्रलंबित आहे. या लालफितीच्या कारभारामुळे अनेक कलावंत वृद्धापकाळात विपन्नावस्थेत जगले आणि मेलेही. आजदेखील ही परिस्थिती कायम आहे. आर्थिक तजवीज नसल्याने वृद्धापकाळात त्यांना उपचारही घेता येत नाहीत. त्यामुळे या कलावंतांना माफक दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विविध शहरांतील नामांकित हॉस्पिटलशी टायअप करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील कलावंतांसाठी मोरया हॉस्पिटलशी टायअप करण्यात आले असून, कलावंतांना उपचारावरील खर्चात २० टक्के सूट दिली जाते. (प्रतिनिधी)
वृद्ध कलावंतांना पेन्शन
By admin | Published: November 18, 2014 12:44 AM