कोल्हापूर : सर्व श्रमिक महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ईपीएस ९५ पेन्शनधारक येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता नागाळा पार्क येथील भाजप जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
पेन्शनरांच्या प्रश्नात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लक्ष घालावे, यासाठी पाठपुरावा करावा म्हणून मंगळवारी राज्यातील भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना निवेदन देऊन मोदी सरकारकडून पेन्शनरांवर होत असलेल्या अन्यायाबाबतचा पाढा वाचला जाणार आहे.
मोदी सरकारकडून पेन्शनरांविरोधातील कारवाया वाढतच चालल्या आहेत. पेन्शन योजनेत दुरुस्ती करुन पेन्शनरांचा खिसा साफ करणे, एकापाठोपाठ एक कमिट्या नेमून वेळकाढूपणा करणे, पेन्शनधारकांनी लढून मिळवलेले हक्क कोर्टबाजीत अडकवणे अशा तऱ्हेने पेन्शनरांचा विश्वासघात मोदी सरकारकडून सुरु आहे. याविरोधात निघणारा हा मोर्चा शिवाजी पार्क येथील विक्रम हायस्कूलच्या पटांगणावर सुरु होणार आहे, यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचेे सचिव अनंत कुलकर्णी व प्रकाश जाधव यांनी केले आहे.