कोल्हापूर : जिल्ह्यातील पेन्शनरांनी १६ नोव्हेंबर- पेन्शनर विश्वासघात दिवस पाळून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाच्या दारात घोषणा देत मंगळवारी (दि. १७) मोदी सरकारचा निषेध केला. पेन्शनचा प्रश्न मार्गी न लावल्यास झोला लेके चल पडो हे राजीनामा मागणारे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला.ईपीएस ९५ ही योजना दि. १६ नोव्हेंबर १९९५ रोजी एका अध्यादेशाद्वारे कामगारांवर लादण्यात आली. पेन्शनपात्र वेतनावर मर्यादा आणि महागाई भत्त्याचा अभाव यांद्वारे फसवणूक केली असल्याचे पेन्शनर संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा दिवस ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटीकडून विश्वासघात दिवस म्हणून पेन्शनरांकडून मानला जातो. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने पेन्शनरांचा विश्वासघात केला आहे.
२०१४ पेन्शन योजनेत बदल करून पेन्शनरांचे नुकसान केले आहे. कोशियारी समितीची अंमलबजावणी टाळण्यासाठी नवनवीन समित्या नेमून वेळकाढूपणा केला आहे. दिलेल्या आश्वासनांचा सरकारने विश्वासघात केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे. या आंदोलनात अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, गोपाळ पाटील, बाळासो पाटील, दिनकर पाटील, काशीनाथ पाटील, भाऊसाहेब यादव, आदी सहभागी झाले. दरम्यान, वारणा परिसर सहकार निवृत्ती सेवक पेन्शनधारक संघाने पेन्शनरांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिले.आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
- सरकारने धोरण बदलावे. पेन्शनरांचे प्रश्न सोडवावेत.
- ९००० रुपये पेन्शन, महागाई भत्ता द्या.
- कोशियारी समितीची अंमलबजावणी करा.
- पेन्शनरांना रेशन, प्रवासात सवलत, मोफत वैद्यकीय सुविधा द्या.