सेनापती कापशी : आजपर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत अनेक मंदिरांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिले. येथील भैरवनाथ मंदिराचे काम आकर्षक झाले असून या मंदिरामुळे चिकोत्रा खोऱ्याच्या वैभवात भर पडली आहे. गावागावातील ही सुंदर देवालये बघण्यासाठी राज्यभरातील लोक येतील, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
अर्जुनवडा (ता. कागल) येथे ग्रामदैवत श्री. मरगाई देवी व श्री. भैरवनाथ देवाच्या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा शशिकांत खोत होत्या.
मंत्री मुश्रीफ म्हणाले अर्जुनवाड्यातील हे सुंदर असे मंदिर साकारण्यामध्ये ग्रामस्थांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वी मंदिर उभारणीसाठी ७ लाख रुपये निधी दिला आहे. आता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. ग्रामविकास मंत्री पदाचा उपयोग खऱ्या अर्थाने जनतेसाठी कसा होऊ शकतो, हे या पाच वर्षांच्या कालखंडात दाखवून देऊ.
गुरुवारपासून सलग चार दिवस या ठिकाणी विविध धार्मिक विधी, अभिषेक, सुरू होते. समस्त ग्रामस्थ व देवस्थान उपसमितीचे सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून भक्तिमय वातावरणात हा वास्तुशांती सोहळा संपन्न झाला.
ग्रामस्थांच्यावतीने सरपंच व देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रदीप पाटील यांनी आभार मानले. विशाल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच अजितकुमार पाटील, आर. के. लाडगावकर, भारत सातवेकर, बळीराम मोरे, रवींद्र लाडगावकर, जी. जी. पाटील, भीमराव ढोले, टी. जी. पाटील उपस्थित होत्या.
फोटो ओळी.......
अर्जुनवाडा (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री. मरगाई देवी व श्री. भैरवनाथ मंदिराचे उद्घाटन करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच अजितकुमार पाटील, भारत सातवेकर, विकास पाटील व ग्रामस्थ.