चंदगड :
राज्य शासनाने लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्याबाबत घोषणा केली; परंतु त्यामध्ये यू-टर्न घेऊन ती भरण्याबाबत तगादा लावला आहे. शिवाय वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली शासन पातळीवर नाहीत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासूनही शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता राज्य सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे त्रस्त झाली आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
चंदगड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राज्य सरकार विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवून, त्यांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष म्हणून मी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाहीही दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, सरपंच माधुरी सावंत, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती शांताराम पाटील, उपाध्यक्ष अंकुश गवस, बबन देसाई, यशवंत सोनार, उदयकुमार देशपांडे, समृद्धी काणेकर, सरचिटणीस रवींद्र बांदिवडेकर आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी स्वागत केले. सरपंच आर. जी. पाटील यांनी आभार मानले.
---------------------
संस्कार जनसेवेचे
सत्ता असो वा नसो सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत राहण्याचे संस्कार स्व. राजेविक्रमसिंह घाटगे यांनी माझ्यावर केले आहेत. हे करीत असताना कितीही टीका-टिप्पणी झाली तरी माझ्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठीच्या सेवेच्या व्रतात मी खंड पडू देणार नाही. त्याप्रमाणेच भाजप पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहावे व माणसे जोडावीत, असे आवाहन घाटगे यांनी केले.
------------------------
फोटो ओळी : चंदगड येथे भाजप पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र प्रदान करताना जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे. राज्यमंत्री भरमू पाटील, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : २१०३२०२१-गड-०५