लोकमत न्यूज नेटवर्क
शिवाजी सावंत
गारगोटी : मेघोली दुर्घटनेनंतर भुदरगड तालुक्यातील फये आणि वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या भक्कमपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन प्रकल्पांच्या खाली येणारी गावे दडपणाखाली असून, त्यांना जीवनदायी असणारे हे प्रकल्प म्हणजे ‘भीक नको; परंतु कुत्रा आवर’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरीस वरदान ठरलेल्या फये लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सुरुवातीपासून पायथ्याला असलेल्या मुख्य गेटला प्रचंड गळती आहे. अनेक उपाययोजना करूनही ही गळती निघालेली नाही. सुमारे ९७२ हेक्टर लाभक्षेत्रासह परिसराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या तलावामुळे सुटला आहे; परंतु या गळतीमुळे धरणाच्या बांधाला धोका निर्माण झाला आहे.
या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील परिसर उजाड व बोडका माळ होता. या परिसराच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी १९९८ साली फये येथे पायाखुदाईस सुरुवात झाली, पायाखुदाईपासूनच या प्रकल्पाचे काम वादग्रस्त ठरले. प्रकल्पाची उंची ३३.४२ मी., लांबी ३५५.६५ मी. साठवणूक क्षमता १३८.८८ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पाचे ९७२ हे. लाभक्षेत्र असून, ७०० हे. सिंचन क्षेत्र आहे. या प्रकल्प क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो, गतवर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता; पण प्रकल्पाच्या मुख्य गेटलाच प्रचंड गळती असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. पाटबंधारे विभागाने शेतीसाठी दोन वेळा पाणी दिले. उर्वरित पाणी गेटच्या गळतीतून वाहून गेले. गेली २० वर्षे संबंधित खात्याला गळती काढण्यास अपयश आले आहे. आजही येथून गळती सुरू आहे.
पाटगाव परिसरातील वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्प हा सुरुवातीपासून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चर्चेत आहे. मागील महिन्यात या प्रकल्पाचा सांडवा तुटून गेला आहे. ज्या तलावाचा सांडवा तग धरू शकत नसेल तर भिंत कशी तग धरणार, असा प्रश्न प्रशासनाला विचारत सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे यांनी उपोषण केले आहे. या प्रकल्पाची निविदा मंजूर करण्यासाठी १८० दिवस लागले. १५ जून २०१२ मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाची मूळ किंमत ६.०८ कोटी होती. सुधारित किंमत १३.५३ कोटी झाली आहे. निविदा १४.१४ टक्के जादा दराने मंजूर केली आहे. ६.८१ कोटी अतिरिक्त दायित्वास मंजुरी दिली. १४ व्या रनिंग बिलापर्यंत ११.८५ कोटी रुपये ठेकेदारास अदा केले आहेत. निविदा मंजुरीनंतर प्रकल्पाच्या नकाशामध्ये बदल करून धरणाच्या उंचीमध्ये वाढ झाल्याचे दाखवून संकल्पचित्र बदलून प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये वाढ केली आहे. धरणाच्या सांडवा भागातील खोदकामात निघालेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे दगड पिचिंग कामासाठी वापरले आहेत. त्यामुळे या तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, हा तलावदेखील लोकांच्या मुळावर उठण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फोटो ओळ
फये धरण