कोल्हापूर : राजकीय विद्यापीठ म्हणून राज्यभर ओळख असलेल्या कागलमध्ये गुरुवारी विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू कारखाना कार्यस्थळावरील पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा टोकाच्या ईर्ष्येचे दर्शन घडले. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत डावलल्याने चिडलेल्या मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘कागलचा पर्मनंट डॉक्टर’ अशा आशयाचे पोस्टर झळकविले. त्याला प्रत्युत्तर म्हणून समरजितसिंह गटाने ‘जनतेचं ठरलंय, वारं फिरलंय’ अशा आशयाचे फलक लावले. कार्यक्रमाच्या मार्गावरच घाटगे-मुश्रीफ यांच्यात रंगलेल्या पोस्टर वॉरची दखल मुख्यमंत्र्यांनाही घ्यावी लागली.
कागलमध्ये गुरुवारी विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार मुश्रीफ यांना वगळून जिल्ह्यातील सर्व पक्षांतील नेत्यांना निमंत्रण देण्यात आले. यावरून तालुक्यात घाटगे-मुश्रीफ कार्यकर्त्यांमध्ये ईर्ष्येने पेट घेतला होता. याची परिणती पोस्टरबाजीमध्ये झाली. मुख्यमंत्री येणाऱ्या मार्गावर आमदार मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी कागलचा पर्मनंट आमदार, महाडॉक्टर, आपल्या हक्काचा माणूस, जिथे अंत:करणपूर्वक कळवळा तेथेच असा जिव्हाळा अशी पोस्टर मोक्याच्या ठिकाणी लावली. घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टरच्या पुढेच आमदार २०१९, जनतेचं ठरलंय, वारं फिरलंय, आता हवं नेतृत्व नवं, एकच ध्यास- मिशन २०१९, भेटला शेरास सव्वाशेर, अशा आशयाचे भलेमोठे पोस्टर लावले. लक्ष्मी टेकडीपासून सुरू झालेले हे पोस्टर वॉर जयसिंगराव तलाव कमान, एस. टी. डेपो, टेलिफोन भवन, ओव्हरब्रिज, कारखाना कार्यस्थळ येथेही सुरू होते. कार्यक्रमासाठी येणाऱ्यांच्या नजरेत हे पोस्टर वॉर सुटले नाही. मुख्यमंत्र्यांनीही या पोस्टरवरून जोरदार टोलेबाजी केली, त्याला उपस्थितांनीही टाळ्या-शिट्ट्यांनी दाद दिली.
ईर्ष्येचा नवा अध्यायविधानसभा निवडणुकीतील कागलमधील संघर्षाची झलकच या पोस्टर वॉरने दाखविली. दोघांनीही लोकांना भेटतानाचे, रुग्णसेवेचे फोटो वापरून आपली प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी घाटगे-मंडलिक असा सुरू झालेला ईर्ष्येचा प्रवास घाटगे-घाटगे, मुश्रीफ-मंडलिक असा करीत मुश्रीफ-घाटगे या वळणावर येऊन ठेपला आहे.