लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे सभासद फार हुशार आहेत. कोणी काय केले, याचा हिशेब त्यांच्याकडे आहे. महालक्ष्मी दूध संघ कोणी बुडविला, हे लोक विसरलेले नाहीत, अशी टीका ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
अरुण नरके म्हणाले की, गेली ४४ वर्षे दूध संघाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात होतो. आता सुपुत्र चेतन नरके हे सत्तारूढ आघाडीकडून उभे आहेत. स्वर्गीय आनंदराव पाटील -चुयेकर यांनी ‘गोकुळ’मध्ये संधी दिली, त्याचे सोने केले. दूध उत्पादक केंद्र बिंदू मानून काम केल्याने हे वैभव उभे राहिले; मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत या वैभवाची बदनामी विरोधी आघाडीकडून सुरू आहे. मंत्री, आमदार, खासदारांना ‘गोकुळ’ का हवा आहे? हे ‘गोकुळ’ सक्षम असल्याचे धोतक आहे. त्यामुळेच प्रत्येकाला आपण दूध संघात जावे, असे वाटते. चुकीचा कारभार असता तर तिथे जायला कोणी धाडस केले नसते. सभासदांच्या भल्यासाठी संस्थांमध्ये गाठोडे बांधून ठेवायचे असते, हे स्वर्गीय डी. सी. नरके यांची शिकवण कायम मनात ठेवून संस्थांमध्ये आम्ही काम केले, त्यामुळेच आज ४०० कोटीच्या ठेवी होऊ शकल्या.
आपण मुश्रीफांचा पराभव केला
मार्केटींग फेडरेशनच्या निवडणुकीत पहिल्यांदा हसन मुश्रीफ यांनी मला मदत केली; मात्र दुसऱ्या निवडणुकीत तेच माझ्या विरोधात उभे राहिले. त्यांचाही आपण पराभव केल्याची आठवण अरुण नरके यांनी सांगितली.
टँकरचा आरोप तथ्यहीन
‘गोकुळ’मध्ये दुधाच्या टँकरचे फेरनिविदा काढल्या तर त्याच दिवशी एक रुपया जादा दर देऊ शकतो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले, यावर बोलताना नरके म्हणाले की, बाहेर राहून काहीही बोलता येते. दुधाच्या वहातुकीतील नुसते पैसे दिसतात, त्यातील जोखीम दिसत नाही, हे आरोप तथ्यहीन आहेत.
संचालकांच्या जाण्याने काडीचाही फरक नाही
अनेक वर्षांचे साथीदार यावेळेला आपणाला सोडून गेले, यावर नरके म्हणाले की, त्यांच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही. ते अध्यक्ष पदासह इतर फायदा घेऊन गेले, हे सभासदांना माहिती आहे.