कोल्हापूर : मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करून त्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्याच्या प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, असा इशारा देऊन घाबरविण्याच्या ऐवजी सावध केल्यामुळे कोल्हापूरकरांनी आपल्याला दुवा दिला, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले.आमदार पाटील म्हणाले की, एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी शहरातील मतदारांची माहिती गोळा करताना बँक खात्यांचीही माहिती मागत असल्याने आपण या प्रकाराची चौकशी केली. अशा प्रकारे काळा पैसा वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठविणे हे मनी लाँडरिंग असून त्यामुळे या प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, त्यांची काही चूक नसताना ते चौकशीत अडकू शकतात असे आपण सावध केले.लोकांनी अजाणतेपणाने बँकेच्या खात्यांची माहिती दिली होती. पण आपण संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराबाबत सावध वेळीच केल्याबद्दल आपल्याला अनेक नागरिकांनी दुवा दिला. आपला प्रयत्न लोकांना घाबरविण्याचा नव्हे तर सावध करण्याचा होता व ते लोकांना आवडले. आपण मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.आपल्यासारखा मोठ्या पक्षाने...शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली, तर त्याबाबत आपल्यासारख्या एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त करावी असे काही नाही. कारवाई मान्य नसेल तर राऊत यांनी न्यायालयात दाद मागावी. त्यांनी भ्रष्टाचार केला नाही, असे पत्रकारांना सांगून उपयोग नाही. त्यांचा काही दोष नसेल तर त्यांनी न घाबरता न्यायालयाकडे जावे.
चंद्रकांतदादा म्हणतात, सावध केल्यामुळे 'ईडी'बद्दल लोकांनी दुवाच दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 12:19 PM