शिरोळ : शेतकऱ्यांच्या विवंचना काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देखील म्हणतात, मी शेतकरी आहे; पण जो शेतात काम करतो, ज्याचा सात-बारा आहे, त्यालाच शेतकरी म्हणतात. यापूर्वी ज्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मोठमोठी धरणे करून पाण्याची उपलब्धता करून दिली त्यांना विसरणे अवघड आहे. जो जनतेसाठी काम करतो, त्यालाच जनता मतदान करून निवडून आणते. काँग्रेसचे तिकीट मिळाले म्हणजे आमदार ही पद्धत आता बंद झाली आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी केली.शिरोळ येथील भूमाता कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन कार्यालयाचा प्रारंभ शनिवारी मंत्री शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री शिवतारे म्हणाले की, शिरोळ भूमाता सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले कार्य सुरू आहे. उल्हास पाटील यांच्या रूपाने पक्षविरहित भावनेतून जनतेसाठी काम करणारा आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांशी एकरूप झालेला आमदार या तालुक्याला लाभला आहे. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी आपल्या संस्थांचा इतिहास, शेतकऱ्यांबद्दलचे योगदान, चळवळ याबाबतची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, दिलीपराव पाटील, पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले, उपसभापती कविता चौगुले, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, अशोकराव माने, स्वाती सासने, बंडा माने, संजय माने, धनाजीराव जगदाळे, भाजपचे तालुका अध्यक्ष धैर्यशील देसाई, शिवाजीराव माने-देशमुख, संतोष जाधव, रावसाहेब पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जो काम करतो, त्याला जनता निवडते
By admin | Published: April 10, 2017 12:09 AM