कोल्हापूर : महाडिकांवर टीका केली की प्रसिध्दी मिळते, हे माहिती असल्यामुळे महाडिकांच्या नावाचा जप करण्याची सवय अनेकांना आहे. परंतु पालकमंत्र्यांच्या अहंकाराचे उत्तर जनताच देणार असल्याचे प्रत्युत्तर माजी आमदार अमल महाडिक यांनी बुधवारी दिले.
कसबा बावडा येथील पाणी टाकी उद्घाटनावेळी सतेज पाटील यांनी, शिरोलीकरांना पाणी पाजायचे आहे अशी टीका केली होती. त्याला महाडिक यांनी पत्रकाव्दारे उत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे की, आमच्या प्रयत्नांमुळे भाजपा सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. आज शहरातील ज्या पाईपलाइनच्या, ड्रेनेजच्या कामांची उद्घाटने तुमचे नगरसेवक व तुम्ही करताय, ती कामेसुद्धा माझ्या प्रयत्नांतून मंजूर झालेली आहेत, हे लक्षात असू द्या. निवडणुका तोंडावर आहेत म्हणून फक्त उद्घाटन करणाऱ्या पालकमंत्र्यांनी कुठला तरी संदर्भ कुठे तरी जोडून मोठं कर्तृत्व गाजवल्याच्या अविर्भावात राहू नये. त्या टाकीच्या कामासाठी कधी मंजुरी मिळाली होती? निधी कुठून आला? काम पूर्ण करायला किती व का वेळ लागला? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत आणि उत्तर देण्याचं धाडस नसेल तर इतकी वर्षे हे काम लटकवत ठेवून, बावडेकरांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिल्याबद्दल त्यांची जाहीर माफी मागावी, असेही माजी आमदार महाडिक यांनी म्हटले आहे.