प्रवीण देसाई।कोल्हापूर : देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या आपत्ती येत असतात, त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणपर्यंत दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम हाती घेतले जातात. कोल्हापूर जिल्हाही यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यावर्षी काही अभिनव गोष्टी आपत्ती व्यवस्थापनामध्ये राबविल्या जात आहेत. त्यामध्ये ‘समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन’ हा उपक्रम कार्यान्वित केला आहे. यामध्ये लोकांकडूनच लोकांचे आपत्ती व्यवस्थापन केले जाणार आहे, यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याशी साधलेला थेट संवाद.
प्रश्न : आपत्ती व्यवस्थापनातील नव्या संकल्पना काय आहेत?उत्तर : ‘समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन’ हा उपक्रम आपण यावर्षीच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात राबवित आहोत. यामध्ये लोकांनीच लोकांसाठी आपत्ती व्यवस्थापन करायचे आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आपदा मित्र कार्यक्रमाची आपल्याला खूप मोठी मदत होत आहे. या कार्यक्रमांतर्गत आपण जिल्ह्यातील पूरबाधित तालुक्यांमधून तरुण, होतकरू आणि धाडसी युवक आणि युवतींना आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षित केले आहे.
प्रश्न : पाऊस आणि पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय नियोजन आहे?उत्तर : जिल्ह्यात सन २००५ पासून अनेकवेळा पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे; त्यामुळे पूरपरिस्थितीत बाधित होऊ शकतील, अशी जिल्'ातील १२९ गावे, भूस्खलन किंवा दरडी कोसळून जमीन खचून बाधित होऊ शकतात, अशी साधारणपणे १७ गावे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व गावांचा आपत्ती व्यवस्थापनाचा पूर व्यवस्थापनाचा आराखडा आपण २०१९ साठी अद्यावत केलेला आहे.
प्रश्न : आपत्कालीन परिस्थितीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने होतो?उत्तर : आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण जगामध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही संकल्पना पुढे आली आहे. याचा वापर आपत्ती व्यवस्थापनासाठी करणे म्हणजेच नवीन तंत्रज्ञान अंगीकारणे असा त्याचा अर्थ होतो. कोल्हापूर जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो आहोत. सोशल मीडियाचा त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.अत्याधुनिक १५ मोटर बोटीआपत्ती व्यवस्थापनात बचाव कार्य करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे १५ अत्याधुनिक रेस्क्यु मोटर बोट, लोकांचे जीव वाचविण्यासाठी २०० लाईफ जॅकेट, २०० लाईफ रिंग, १०० फ्लोटिंग रोप (पाण्यावर तरंगणारे दोर), झाडे कट करणारे सॉ कटर मशीन, एकमेकांमध्ये संदेशवहन करण्यासाठी १२ वॉकीटॉकीच्या सेट्सचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोणतीही आपत्ती असो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमीच सज्ज असतो. नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी कार्यरत असतात. पावसाच्या पार्श्वभूमीवरही सर्व तयारी झाली आहे.- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी