गडहिंग्लज : गांधीजींच्या विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश अशी माणसं मरत नसतात. त्यांनी गांधीजींचा विचार मोठा केला, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.येथील लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या सांगता सोहळ्यात पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे होते. उपनगराध्यक्ष नितीन देसाई, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. लहान माणसं विस्मरणात जातात. मोठ्या माणसाची आठवण जगभर राहते. त्यामुळेच सत्याग्रही गांधीजी मारले जाऊनही त्यांची आठवण जगभर आजही कायम आहे, असेही द्वादशीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.साने गुरुजी वाचनालयातर्फे श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते कॉ. संपत देसाई यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने, तर नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कवी दिनकर मनवर यांचा साने गुरुजी साहित्य पुरस्काराने गौरव झाला. प्रत्येकी २५ हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. भगवंता लहू कांबळे यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, तर अशोक पट्टणशेट्टी व अंजली सावंत यांना भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्कार देण्यात आला. द्वादशीवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले.अॅड. शिंदे म्हणाले, माणसं मारून विचार संपत नाही, हे त्यांना कधीतरी एक दिवस समजेल.कॉ. देसाई म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जाणाºया काळात मिळालेल्या दाभोलकर पुरस्काराने सामान्य जनतेच्या लढाईला बळ मिळाले आहे. कवी मनवर यांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी राजन गवस, बाळासाहेब मोरे, आप्पा डिंगणकर, अरुण नाईक, नितीन पाटील, आदी उपस्थित होते. वाचनालय व शिक्षण समिती सभापती नरेंद्र भद्रापूर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब मुल्ला यांनी अतिथी परिचय करून दिला. गणपतराव पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी आभार मानले.गडहिंग्लज पालिका ‘गुणग्राहक’ !राजकारणी माणसांना चांगल्या माणसाचं कौतुक करण्याची बुद्धी होत नाही, परंतु आदर्श वाचक, आदर्श शिक्षक, आदर्श कार्यकर्ता आणि साहित्यिकांचा गौरव करणारी गडहिंग्लज पालिका गुणग्राहक आहे, या शब्दांत संपादक द्वादशीवार यांनी गडहिंग्लज नगरपालिकेचे कौतुक केले.
गांधी विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:03 AM