शिवाजी सावंत --गारगोटीजिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुक पतिराजांच्या सौभाग्यवती आता लढणार आहेत. गतवेळी काँग्रेसचे राहुल देसाई यांनी विजय मिळविला होता. यावेळी येथे लढत अटीतटीची होणार आहे. येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, बजरंग देसाई व के. पी. पाटील या दोन माजी आमदार आणि विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या घरचा मतदारसंघ असल्याने लढती विशेष लक्षणीय होणार आहेत. पालकमंत्री विरुद्ध दोन माजी आमदार विरुद्ध विद्यमान आमदार असा प्रतिष्ठेचा सामना होणार आहे.येथे गतवेळी काँग्रेसचे राहुल देसाई विजयी झाले होते. त्यावेळी आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्यात युती झाली होती, तर राष्ट्रवादी एकाकी लढली होती. तत्कालीन आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह पाटील व राहुल देसाई यांच्यात ही लढत झाली होती. पंचायत समिती गारगोटी गणातून आमदार आबिटकर गटाच्या विजयमाला चव्हाण, तर मडिलगे गणातून काँग्रेसच्या वैशाली घोरपडे निवडून आल्या होत्या. हा मतदारसंघ महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने काँग्रेसकडून रेश्मा राहुल देसाई, विजया प्रकाशराव देसाई, वैशाली सचिन घोरपडे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून संजीवनी विजय आबिटकर, सुप्रिया जयवंत गोरे, सुवासिनी पंडितराव केणे, राजश्री रघुनाथ शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर गटातून रोहिणी अर्जुन आबिटकर, विजयमाला बाजीराव चव्हाण, छाया अंकुश चव्हाण, सरिता नंदकुमार ढेंगे, भाजपमधून अमृता अलकेश कांदळकर, नीलम राहुल चौगले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अॅड. अमृता सम्राट मोरे, तर अपक्ष म्हणून निर्मला सयाजी देसाई, धनंजय महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे यांच्या सौभाग्यवती नंदाताई शिंदे हे इच्छुक उमेदवार आहेत.या मतदारसंघात दोन विद्यमान सदस्य असलेल्या राहुल देसाई व प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या सौभाग्यवती निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माजी सभापती वैशाली घोरपडे व उपसभापती विजयमाला चव्हाण या इच्छुक आहेत. राहुल देसाई यांनी लाखो रुपयांचा निधी खर्च करून विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर वैशाली घोरपडे यांनी सभापती म्हणून काम करताना अनेक ठिकाणी तुटपुंजा निधी असताना देखील पती सचिन घोरपडे यांच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांचा निधी उपलब्ध करून विकासकामे पूर्ण केली आहेत, तर विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी या मतदारसंघात केलेली विकासकामे, राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनीसुद्धा आमदार असताना लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. राजश्री शिंदे या दहा वर्षे महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांनी गारगोटीच्या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केले आहे. हा सर्व आलेख पाहता सर्व उमेदवार तुल्यबळ आहेत. सर्वांचा उमेदवारी मागणीचा दावा आहे; पण तरीही यावेळी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाल्यावर बलाबल ठरेल. तूर्त जरी काँग्रेसची सत्ता असली तरी राष्ट्रवादी आणि आमदार गटाची ताकद तुल्यबळ आहे. या विभागातील जय-पराजय हा गारगोटी शहरावर अवलंबून आहे. त्यातच उद्योगपती सयाजी देसाई आपल्या सौभाग्यवती निर्मला देसाई यांना रिंगणात उतरविणार असल्याने निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. ते स्वत: आकुर्डे मतदारसंघात, तर पत्नी गारगोटी मतदारसंघात उभा राहणार असल्याने दोन्ही ठिकाणी जोरदार संपर्क वाढविला आहे. मौनी विद्यापीठाचे शासकीय प्रतिनिधी अलकेश कांदळकर हे पत्नी अमृता यांना उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे याच्या जोरावर प्रथमच भाजप रिंगणात उतरणार आहे. तर महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातून नंदकुमार शिंदे प्रथमच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रवेश करणार आहेत. गारगोटी पंचायत समिती गण अनुसूचित जाती प्रवगार्साठी राखीव आहे. येथे प्रियांका भोपळे, साक्षी भोपळे इच्छुक आहेत.मडिलगे पंचायत समिती सर्वसाधारण पुरुषसाठी असल्याने अनेक इच्छुक सरसावले आहेत. यामध्ये काँग्रेसमधून सचिन घोरपडे, संजय देसाई, राष्ट्रवादीतून अतुल नलवडे, पंडितराव केणे, संग्राम देसाई, महेंद्रसिंग देसाई, संदीप जठार, बाळासाहेब शिंदे, अमर पाटील, आमदार आबिटकर गटातून शिवाजीराव ढेंगे, तानाजी जाधव, सुनील जठार, पंडित पाटील, भाजपमधून नामदेव चौगले, विलास माळवेकर इच्छुक आहेत.
गारगोटीत पालकमंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: January 24, 2017 12:41 AM