कोल्हापूर : १५ वर्षांपूर्वी पहिल्या झटक्यात चार आमदार निवडून आणणाऱ्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने जिल्ह्यात चार जागा लढविल्या; मात्र संस्थापक कोरे वगळता अन्य कोणालाही यश मिळाले नाही; मात्र हातकणंगले आणि चंदगड मतदारसंघात चुरस वाढविण्यासाठी आणि शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी जनसुराज्यचे उमेदवार कारणीभूत ठरले.
डॉ. विनय कोरे यांनी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून २८७९९ मतांना शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला. बेरजेचे राजकारण करत आणि गेल्यावेळच्या चुका टाळत कोरे यांनी एक लाख २४ हजार ८६८ मते मिळवून नारळाच्या बागेत गुलाल उधळला.
भाजपची बी टीम म्हणून शिक्का पडलेल्या जनसुराज्यने भाजपच्या तिघांना जनसुराज्यची उमेदवारी दिली. यातील हातकणंगले मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांना उमेदवारी दिली. ते सुरुवातीपासून आघाडीवर होते; मात्र नंतरच्या टप्प्यात राजूबाबा आवळे आणि विद्यमान शिवसेना आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी आघाडी घेतली आणि माने तिसºया क्रमांकावर राहिले; मात्र त्यांनी दुसºया तालुक्यातील असूनही लक्षणीय अशी ४४५६२ मते घेतली. माने यांची उमेदवारी या ठिकाणी मिणचेकर यांना अडचणीची ठरली आहे.शेजारच्याच शिरोळ मतदारसंघातून भाजपमधून बाहेर पडलेले ‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांनी जनसुराज्यची उमेदवारी घेतली. त्यांना १४७७६ मते मिळाली आहेत. उल्हास पाटील यांच्या पराभवाला या ठिकाणी हातभार यादव यांनी लावला आहे.
चंदगड मतदारसंघातून आजरा येथील आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी १२0७८ मते मिळविली. चराटी यांनी येथून जनसुराज्यतर्फे निवडणूक लढविली. कोरे हे विजयी झाले, तर अशोकराव माने तिसºया, अनिल यादव चौथ्या क्रमांकावर, तर चराटी पाचव्या क्रमांकावर राहिले आहेत. एकूणच जनसुराज्यने पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात खाते उघडले आहे; मात्र त्यांच्या उर्वरित तीन उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.कोरे महायुतीसोबतचविनय कोरे निवडणूक लागण्याआधी महायुतीचे सहावा घटक पक्ष होते. सोईसाठी ते स्वतंत्रपणे लढले; मात्र राज्यात युतीचीच सत्ता येणार असल्याने साहजिकच कोरे पुन्हा एकदा महायुतीमध्ये सहभागी होतील, यात शंका नाही.