कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे आवश्यक असलेल्या विविध उपयोजना करण्यात येत असल्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची टक्केवारी १५.३८ टक्क्यावरून ८.४८ टक्क्यांपर्यंत खाली आली असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.
कोरोना संसर्गच्या काळात महापालिकेने रुग्णशोध विशेष मोहिमेवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त तपासण्या केल्या. महापालिकेने तपासण्या केल्यानंतर बाधित रुग्ण लवकर आढळून आले. दि.१० मे ते १८ जूनअखेर शहरातील कोरोनाबाधितांची टक्केवारी १५.३८ वरून ८.४८ टक्क्यांपर्यंत खाली आली. आरोग्य विभागाने घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे ही टक्केवारी कमी करण्यात यश आले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
१० मे ते १८ जून या कालावधीत आरोग्य पथकामार्फत शहरांत संजीवनी अभियान, व्याधीग्रस्त नागरिकांची तपासणी मोहीम, माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातील नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. या काळात एक लाख १० हजार २२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर त्यामध्ये १२ हजार १२८ नागरिक बाधित आढळून आले. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी आणण्यासाठी यापुढेही प्रशासनाकडून कोरोना चाचण्या जास्तीत जास्त कशा होतील याच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नागरिकांनी काही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य पथकाशी संपर्क साधून संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
- तपासणीचा कालावधी तपासणी संख्या कोरोनाबाधित रुग्ण
१० मे ते १६ मे १० हजार ५३५ १६२०
- १७ ते २३ मे १६ हजार ८८१ १३३८
- २४ ते ३० मे २२ हजार ३७५ २८८७
- ३१ मे ते ६ जून १८ हजार ३८८ २२२२
- ५ जून ते १३ जून २३ हजार १४३ २४५७
- १४ ते १८ जून १८ हजार ९०४ १६०४