कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यातील पहिल्या दहा दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी पंधरावरून अकरा टक्केपर्यंत खाली तर मृत्युदर एक टक्के इतका खाली आला असल्याची माहिती डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
लसीकरणाबाबत माहिती देताना बलकवडे यांनी सांगितले की, आतापर्यंत एक लाख २० हजार ४८० नागरिकांना पहिला डोस तर ४२ हजार ३६३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. साठ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच गंभीर व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी त्यांच्या घराजवळील केंद्रावर लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच ठिकाणी अशी सोय असून या ठिकाणी गुरुवारी एका दिवसात ५८७ नागरिकांना तसेच २२ दिव्यांगाना लस देण्यात आली. आज, शुक्रवारी केवळ दिव्यांगसाठी लसीकरण केले जाणार आहे.
शहरातील म्युकरमायकोसिसच्या पंधरा रुग्णांचे विश्लेषण करून काही अनुमान काढले. त्यापैकी दहा रुग्ण हे मधुमेही होते. तर त्यांचे डिस्चार्ज झाल्यानंतर दोन ते नऊ दिवसांनी आजाराची लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे. या आजारावर उपचाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. लवकरच जिल्हाधिकारी त्याबाबत निर्णय घेणार आहेत.
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत ४२५ पैकी ३२३ व्याधीग्रस्त विद्यार्थ्याच्या घराचे सर्वेक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या घरातील १५६२ व्यक्तींची वॉकटेस्ट घेतली, ९६४ व्यक्तींचे स्वॅब घेतले. त्यावेळी २६ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसुळ, सहायक आयुक्त संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले उपस्थित होते.
-------
असे घटले रुग्ण..
मे महिन्यात महापालिका क्षेत्रात झालेल्या चाचण्या : २२ हजार ३७५
३१ मे ते १० जूनपर्यंत झालेल्या चाचण्या : २४ हजार ८२५
मे मधील बाधितांचे प्रमाण : १५ टक्के
१० जूनअखेरचे बाधितांचे प्रमाण : ११ टक्के