कोल्हापूर : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर झाला की त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते, असे न करता डॉक्टरांनी रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून मगच उपचार सुरू करावेत अन्यथा त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल, अशा सक्त सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेक रुग्ण जवळच्या जनरल प्रॅक्टिशनर्सकडून जुजबी उपचार करून घेतात. लक्षणे दिसत असली तरी डॉक्टर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करायला लावत नाहीत. नंतर आजार बळावला की रुग्ण सरकारी दवाखान्यात दाखल केला जातो. तसे अनेक खासगी दवाखान्यांमध्ये आठ दिवस रुग्णांवर उपचार सुरू असतात, रुग्णाची स्थिती अतिगंभीर झाली की त्यांना सरकारी दवाखान्यात हलवले जाते यामुळे सरकारी रुग्णालयात मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे दाखल झाल्यानंतर शेवटच्या ७२, ४८ किंवा २४ तासांतील आहेत. याचा अर्थ त्यांना योग्य पद्धतीने उपचार मिळाले नाहीत असाच होतो. त्यामुळे डॉक्टरांनी लक्षणे दिसताच रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या डेथ ऑडिटमध्ये संबंधित डॉक्टरने ही चाचणी केली नसल्याचे आढळून आल्यास त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल.
--
तपासण्यांमुळे पॉझिटिव्ह रेट जास्त
मंत्री पाटील म्हणाले, प्रशासनाने तपासण्या वाढवल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट जास्त दिसत आहे. तरीदेखील पूर्वीपेक्षा कमी होऊन २१ टक्क्यांवर आला आहे. तपासण्या वाढल्याने फायदाच होणार आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती रस्त्यावर फिरली की संसर्ग वाढेल, त्यापेक्षा तपासणीमुळे कोरोनाचे लवकर निदान होऊन तातडीने उपचार सुरू करता येईल. संसर्गदेखील कमी होईल.
---