कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतीबाबत विभागीय कार्यालय अंतर्गत पथक गठित करून शहरातील सार्वजनिक इमारती, रोड, पूल यांचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावर्षी मान्सून लवकर सक्रिय होण्याची शक्यता असल्याने मान्सूनपूर्व तयारीचा आढावा प्रशासक बलकवडे यांनी बैठक आयोजित करून घेतला. मान्सूनच्या अनुषंगाने जी काही निविदा काढावयाची आहे ती रीतसर कार्यवाही ठेवून तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. ड्रेनेजलाइन सफाई करण्याच्या कामाचे नियोजन करून काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरातील धोकादायक वृक्षाबाबत नागरिकांकडून आलेल्या अर्जांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या तसेच इलेक्ट्रिक पोल व विद्युतवाहिनींना अडथळा ठरणारे वृक्ष, फांद्या बाबत महावितरणशी समन्वय ठेवून कार्यवाही करण्याच्या सूचना बलकवडे यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, प्रशासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अधिकारी शंकर यादव, जल अभियंता नारायण भोसले, उप जल अभियंता हर्षजीत घाटगे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघारांबरे, उपजल अभियंता रामदास गायकवाड, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार उपस्थित होते.
पॉइंटर -
- शहरातील १० प्रभागांतील नाले सफाईचे काम पूर्ण.
- नालेसफाईचे उर्वरित काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याचे नियोजन.
- रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पॅचवर्क करण्याची कामे सुरू.
- बालिंगा रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे नवीन ३०० एच.पी.चे दोन पंप बसविणार.
- झूम प्रकल्पावरील कचऱ्यास आग लागू नये म्हणून स्प्रिंकलरद्वारे पाणी मारण्यास सुरुवात.
- शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार वृक्ष लागवड करण्याच्या कामाचे नियोजन.