संदीप बावचे
शिरोळ : दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरोळ तालुक्यात हाहाकार माजविला होता. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत होते. मात्र, आठवडाभरापासून रुग्णसंख्या कमी होत आहे. तालुक्यात ६३३८ पैकी ५३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ८३४ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुका कोरोनामुक्त करायचा असेल तर प्रशासनाने आणखी आक्रमक कामगिरी करण्याची गरज आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस, आरोग्य विभाग, नगरपालिका, ग्रामपंचायत, कोरोना समित्या यासह इतर प्रशासनाला संघटित करून गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढा दिला जात आहे. कोरोना बाधितांना आरोग्य सुविधा पुरविताना कमतरता भासू नये त्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. शासकीय पातळीवर कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांत देखील उपचार केले जातात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तपासण्यांवर भर दिला जात आहे. व्यावसायिक, फळ विक्रेते, रिक्षावाले, संपर्कातील व्यक्ती यांची तपासणी केली जात आहे.
शिरोळ तालुक्यात आजपर्यंत ६३३८ कोरोना बाधित रुग्ण सापडले. यामध्ये १७६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५३२७ रुग्ण बरे झाले आहेत. आठवडाभरापासून रुग्णसंख्या कमी होत असली तरी गृहविलगीकरणातील अजूनही काही रुग्ण बिनधास्तपणे बाहेर फिरत आहेत. त्यामुळे ते कोरोनाचा स्प्रेडर बनत असून, प्रशासनाची चिंता वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. जयसिंगपूर, शिरोळ, अब्दुललाट, उदगाव याठिकाणी कोरोनाचा मोठा फैलाव झाला होता. आता रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अजून कायम असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात होतेय गैरसोय
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आगामी काळात शासन, प्रशासनाबरोबरच शहरी भागात व ग्रामीण भागात ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात कोविड उपचार केंद्रे सुरू करण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी, अशी मागणी होत आहे.