कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) बोगस शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १२६ भावी शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे बोगस आढळून आली आहेत. ही प्रमाणपत्रे रद्द करून त्यांना टीईटी देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्याची कारवाई राज्य परीक्षा परिषदेने केली आहे.सन २०१८ आणि २०१९-२०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार करत अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले असल्याचा ठपका सायबर पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये ठेवला. या पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांतील टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली. या टीईटी परीक्षेत राज्यभरातील ७८०० शिक्षकांनी पैसे देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून पुढे आली. हा गैरव्यवहार समोर आल्याने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांची टीईटी परीक्षेच्या मूळ प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला.त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकूण २५३ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी परीक्षा परिषदेकडे सादर केली आहेत. अद्याप या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या टीईटी प्रमाणपत्रांची राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने पडताळणी करून घेतली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १२६ भावी शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पाठविली. ज्या शिक्षकांची बोगस प्रमाणपत्रे आढळली आहेत, त्यांची यादी अद्याप आम्हाला प्राप्त झालेली नाही. -आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी