चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी महापालिका कायमस्वरूपी केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पॅनेल तयार केले असून, तीन आठवड्यांत हे केंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी दिली.
गेली पाच दिवस ‘लोकमत’मध्ये सुरू असलेल्या ‘कुत्र्यांचा जोर.... नागरिकांना घोर...’ या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, सध्या जीवरक्षा अॅनिमल वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या डॉग व्हॅनमार्फत कुत्री पकडून दिली जात आहेत. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे हे केंद्र सध्या सुरू आहे. त्याच ठिकाणी महापलिका मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी कायमस्वरूपी केंद्र उभारणार आहे.
आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मान्यतेनुसार डॉ. वरुण धूप व डॉ. संतोष वाळवेकर यांचे एक पॅनेल तयार केले आहे. या दोघा डॉक्टरांनी रोज किमान दहा कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांना प्रत्येक शस्त्रक्रियेमागे २५० रुपये दिले जाणार आहेत. जीवरक्षा ट्रस्टमार्फत १० आणि महापालिकेच्या यंत्रणेमार्फत १० अशा दररोज सरासरी २० कुत्र्यांची नसबंदी करण्याच्या शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य आहे.जाराट उचलण्यासाठी खास गाडीशहरातील मटण, चिकनची दुकाने, हॉटेलच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या जादा आहे. या दुकानांतील कचरा (जाराट) तेथील जवळच्याच कचरा कोंडाळ्यात किंवा गटारीत टाकला जातो. त्यामुळे ही कुत्री त्या ठिकाणी कळपाने राहतात. माणसांवर हल्ले करतात. त्यांच्या उपजीविकेचे हे साधनच बंद व्हावे यासाठी हे जाराट गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र वाहन (गाडी ) देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच ही गाडी सुरू होईल, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.कमी मानधनात तयारीभटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासारख्या सामाजिक उपक्रमांत आपले योगदान राहावे म्हणून डॉ. वरुण धूप व डॉ. संतोष वाळवेकर यांनी प्रत्येक शस्त्रक्रियेमागे २५० रुपये इतक्या कमी मानधनात काम करण्यास मान्यता दिली आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच प्रशासनाकडून त्यांचे पॅनेल तयार केले आहे. अन्य शहरांत निर्बीजीकरणासाठी किमान दोन हजार रुपये खर्च येतो, असेही त्यांनी सांगितले.महापालिकेची २५ लाखांची तरतूद‘भटक्या कुत्र्यांचे नर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या वर्षीच्या अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद केली आहे; त्यामुळे पैसे नाहीत म्हणून हे काम थांबणार नाही, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. ( समाप्त)