कोल्हापूर : स्वत:ला ‘पर्मनंट आमदार’ समजणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की घरी बसवेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला. कागलच्या जनतेचे प्रेमच समरजित घाटगे यांना लोकशाहीच्या मंदिरात पोहोचवेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारीचेही स्पष्ट संकेत दिले. यावर उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करून त्यास प्रतिसाद दिला.
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण समारंभानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ यांनी कार्यक्रमाकडे जाणाºया रस्त्याच्या बाजूने ‘पर्मनंट आमदार’ असे डिजिटल फलक लावले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. याच समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘कागल मतदारसंघातून
समरजित घाटगे यांची युतीचे उमेदवार म्हणून घोषणा करावी. आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणतो,’ अशी ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी नूतन खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाहू कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवनच्या दारात हा मेळावा झाला. त्यास कागलसह गडहिंग्लज, आजरा, करवीर तालुक्यांतूनही लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी महाभारतातील कथेचा आधार घेत राजकीय टीका केली. ते म्हणाले, ‘प्रमोद महाजन एक गोष्ट नेहमी आम्हांला सांगायचे. धर्मराज युधिष्ठिर जेव्हा स्वर्गाच्या दारात गेले तेव्हा यक्षाने त्यांना अडविले. मी तुम्हांला तीन प्रश्न विचारणार आहे, त्याचे अचूक उत्तर दिल्यासच तुम्हांला स्वर्गाचे दार उघडेल, असे त्याने सांगितले. यक्षाने विचारले की, या जगातील सगळ्यांत मोठे आश्चर्य कोणते? त्यास युधिष्ठिराने उत्तर दिले. तो म्हणाला, ‘जन्माला येणाºया प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे, हे माहीत असतानाही तो या धरतीवर ‘पर्मनंट’ असल्यासारखा वागतो!’ लोकशाहीतही लोक तुम्हांला पाच वर्षांसाठीच निवडून देतात; परंतु तुम्ही ‘अमरत्व’ प्राप्त झाल्यासारखे वागता! जो जनतेचे काम करतो, त्याला हे अमरत्व नक्की मिळते; परंतु ज्यांचा रस्ता भरकटतो त्यांना घरी बसविण्याचे काम जनता करते. समरजित, कागलच्या जनतेचा आशीर्वादच तुम्हांला लोकशाहीच्या मंदिरात पोहोचवेल. तुम्ही आता जे विकासाचे, समाजाला पुढे नेण्याचे राजकारण करीत आहात, तेच नेटाने करा. स्वत:ची रेषा मोठी करीत राहा.’
स्वकर्तृत्वाने ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान दिले, त्यामध्ये विक्रमसिंह घाटगे यांची नोंद घ्यावी लागेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज ते नाहीत; परंतु त्यांनाही तुमचे कर्तृत्व पाहून आनंद झाला असेल. राजर्षी शाहू महाराजांनी ‘बहुजन हिताय’चा जो मार्ग घालून दिला, तोच विक्रमसिंह यांनी पुढे नेला. त्यांनी साखर उद्योगाची उभारणी केली; परंतु ते राजकीय कार्यात अडकून पडले नाहीत. शेवटच्या माणसाचे परिवर्तन हे त्यांचे जीवनध्येय होते. त्यांनी अनेक संस्थांची उभारणी केली. त्यांनी कर्णबधिर मुलांसाठी शाळा सुरू केल्याने त्यांच्यातील संवेदनशील माणसाचे दर्शन झाले. त्यांचा वसा समरजित, तुम्ही सोडू नका. आयुष्यात अनेक प्रसंग येतात; परंतु त्यामध्ये धैर्य सोडून चालत नाही.जेव्हा तुम्ही समाजासाठी काम करता, तेव्हा समाज तुमच्या पाठीशी राहतो. आज येथे जमलेला हा जनसागर त्याचीच पोहोचपावती आहे. मागच्या चार वर्षांत आपण द्वेषाने नव्हे तर चांगले काम करूनच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विक्रमसिंह घाटगे यांनाही
असेच राजकारण अपेक्षित होते.यावेळी शाहू छत्रपती यांचेही भाषण झाले. कोल्हापूरचे नूतन खासदार संभाजीराजे यांच्यासारखेच चांगले काम करून दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाहू गु्रपचे प्रमुख समरजित घाटगे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ... सबका विकास’ ही घोषणा केली असली तरी तिचे जनक विक्रमसिंह घाटगे हेच आहेत. त्यांनीही या घोषणेप्रमाणेच काम केले. म्हणूनच शाहू समूह हा विकासाचा मॉडेल बनू शकला. मतदारसंघातील नागनवाडी प्रकल्पाला मदत करून चिकोत्रा खोºयातील पाण्याचा प्रश्न सोडवावा, गडहिंग्लज ‘एमआयडीसी’मध्ये चांगले उद्योग आणून ‘मेक इन गडहिंग्लज’ करण्याचा माझा संकल्प आहे. त्यास बळ द्यावे. दूधगंगा डाव्याकालव्याचे काम अपूर्ण आहे, ते मार्गी लागावे.’
व्यासपीठावर आमदार सर्वश्री. सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, शशिकला ज्वोल्ले, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, देवस्थान समितीचे महेश जाधव, बाबा देसाई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, भरमू पाटील, संग्राम कुपेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, घाटगे कुटुंबीयांपैकी सुहासिनीदेवी घाटगे, पुतळा समितीचे अध्यक्ष मृगेंद्रसिंह घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, नंदिता घाटगे, नवोदिता घाटगे, वीरेंद्र घाटगे, आर्यवीर घाटगे, तेजस्विनी भोसले,डॉ. स्वप्निल भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी महेश हिरेमठ यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.शिवाजी महाराज की जय..!शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी अत्यंत भव्य व्यासपीठ होते. दोन्ही बाजंूना स्क्रीन लावण्यात आले होते. व्यवस्था अत्यंत नीटनेटकी होती. व्यासपीठाच्या दोन्ही बाजंूना छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य कटआऊटस लावली होती. घोषणाही तशाच होत्या. त्यावरून विधानसभेच्या प्रचाराची दिशा ध्वनीत होत होती.शिल्पांची पाहणीकारखान्याच्या माळ बंगल्यावरील मुख्य कार्यालयाशेजारीच स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचा अर्धपुतळा साकारण्यात आला आहे. तो शिल्पकार किशोर पुरेकर व अमर चौगले यांनी केला आहे. त्याचे अनावरण केल्यावर मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याच्या मागील बाजूस साकारण्यात आलेल्या अन्य शिल्पांची फिरून पाहणी केली.एफआरपी ९६ टक्के दिली...भाजपवाल्यांना किंवा मोदी-फडणवीस यांना साखर धंद्यातील काय कळतंय, अशी हेटाळणी करणाºयांपेक्षा साखर उद्योगाच्या हिताचे जास्त निर्णय भाजप सरकारने घेतल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ‘राज्यातील कारखान्यांनी २०१७ च्या हंगामातील ९९ टक्के, तर २०१८ च्या हंगामातील ९६ टक्के एफआरपी दिली आहे. साखरेला हमीभावाचा निर्णयही आम्हीच घेतला असून, कारखानदारीच्या इतिहासात जेवढे चांगले निर्णय झाले नव्हते, तेवढे निर्णय भाजप सरकारने घेतले. यापुढच्या काळात साखर हा उपपदार्थ व इथेनॉलसह अन्य उपपदार्थ हेच उत्पन्नाचे मुख्य साधन राहील, अशी जगातील साखर उद्योगाची आजची स्थिती असून, आपल्यालाही त्याकडे वळावे लागेल.’
राज्यात मताधिक्य देऊ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी कागलच्या युतीची उमेदवारी समरजित घाटगे यांना जाहीर करावी, आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी करून दाखवू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यावर सभेत टाळ्यांचा पाऊस पडला. त्यावर पालकमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या टाळ्यांची नोंद घ्यावी, असे सुचविले.संजयबाबांची अनुपस्थितीकागलच्या शेतकरी मेळाव्यास शिवसेनेचे नेते व माजी आमदार संजय घाटगे अनुपस्थित होते. त्याबद्दल कार्यक्रमस्थळी उलटसुलट चर्चा झाली. ‘लोकमत’ने त्यांच्या संबंधितांकडून याबाबत माहिती घेतली असता, असे समजले की, गुरुवारचा कार्यक्रम हा विक्रमसिंहराजे यांच्या पुतळा अनावरणाचा असल्याने आपण त्यास जायचे आहे, अशा सूचना संजय घाटगे यांनी आपल्या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्या होत्या; परंतु या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना शाहू साखर कारखान्याच्या एका संचालकाकडून पाठवून देण्यात आले. समरजित घाटगे यांच्याकडून कार्यक्रमास यावे, असे साधे फोनवरुनही निमंत्रण नव्हते; त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना आमची गरज नसेल, तर कशाला जावा अशी भूमिका घेतल्याने संजय घाटगे या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. ते दिवसभर व्हनाळी येथेच होते. मुलगा अंबरीश घाटगे दिवसभर जिल्हा परिषदेत होते. दोन्ही घाटगे यांना एकत्रित आणून आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात एकास एक लढत देण्याच्या पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना संजय घाटगे यांच्या अनुपस्थितीने ब्रेक लागल्याचे मानले जाते.नूलच्या अपघातग्रस्त कुटुंबीयांना आधारलोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारसभेतून घरी येताना गडहिंग्लजजवळ झालेल्या अपघातात नूल (ता. गडहिंग्लज) येथील सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना भाजपतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. हे धनादेश शारदा चव्हाण, शालन जाधव, रूपाली गरुड, सुवर्णा सावंत, मेघा चव्हाण यांनी स्वीकारले.
शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागल येथे गुरुवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.