कोल्हापूर : महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा. संयुक्त परीक्षा रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.येथील दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. ‘महापरीक्षा पोर्टल बंद झालेच पाहिजे’, ‘बंद करा, बंद करा महापरीक्षा पोर्टल बंद करा’, ‘मागण्या आमच्या हक्काच्या’ अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला. मागण्यांच्या अनुषंगाने फलक हातात घेवून घोषणा देत विद्यार्थी-विद्यार्थीनी मोर्चात सहभागी झाल्या.
व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. तेथील प्रवेशद्वारावर निषेध सभा झाली. त्यामध्ये तौफिक मुल्लाणी, राजू सूर्यवंशी, जॉर्ज क्रूझ, विश्वास पाटील, गिरीश फोंडे, सचिन पाटील यांनी मार्गदर्शन केले. कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन दिले.
मोर्चात जावेद तांबोळी, संतोष पोवार, सतिश सातपुते, गणेश गायकवाड, स्वप्नील गावडे, विलास दुरगुळे, सरदार बिडकर, भाग्यश्री गोसावी, प्रशांत आंबी, हरिश कांबळे, अजिंक्य ठाणेकर, किरण घोडके, आदी सहभागी झाले.