कोल्हापूर : पावसाळ्यात आवश्यक असलेली छत्री, प्लॅस्टिक शीट, ताडपत्री, रेनकोट, छत्री दुरुस्त करणारी दुकाने, तसेच घर व इमारतींच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यात जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी याबाबत आदेश काढले असून कोरोनाविषयक नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक व दुकान बंद करण्याची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. राज्य शासनाने बुधवारी पावसाळ्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने सुरू करण्यात परवानगी दिली असून जिल्ह्यासाठी गुरूवारी हा आदेश काढण्यात आला.
यानुसार छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टिक शीट, ताडपत्री, रेनकोट अशा वस्तूंची विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे व पावसाळ्यात घर, इमारतींची दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहतील.
सर्व दुकानदारांनी कर्मचाऱ्यांची कोविड १९ तपासणी व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त किंवा ६० वर्षावरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, कोरोनाविषयक नियमावलींचे पालन करावे, अन्यथा १० हजार रुपये दंड व पुन्हा नियम मोडल्यास संसर्ग कमी होईपर्यंत दुकान बंद केले जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.