कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत राधानगरी धरणावर जन्म सोहळा समितीने आयोजित केलेल्या शाहू जयंती कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मी आणि माझी पत्नी नवोदिता घाटगे या ठिकाणी जयंती साजरी करण्यासाठी जाणार असून कोणाला अडवायचे त्यांनी अडवावे, असे आव्हान घाटगे यांनी दिले आहे.
‘धरण क्षेत्रावर अशा कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही. कारण ही जागा अ वर्ग मर्मस्थळाची आणि प्रवेश निषिध्द असणारी आहे. कलशपूजन व जलाभिषेकसारखे विधी करता येणार नाहीत. तसेच कोरोना महामारीच्या काळात येथे गर्दी करता येणार नाही. याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशा आशयाची नोटीस राधानगरी पोलीस ठाण्याच्यावतीने बजावण्यात आली आहे. छत्रपती शाहु महाराज जन्मोत्सव सोहळा समीतीचे संयोजक संभाजी यशवंत आरडे यांचे नावे ही नोटीस बजावली आहे.
सदरची नोटीस कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असेही म्हटले आहे. २२ जूनला समितीच्या वतीने कार्यक्रमाची परवानगी मागितली होती. शुक्रवारी या ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू होते. ते कामही प्रशासनाने रोखले आहे. सकाळीच समरजित घाटगे हे कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी गेले होते.
चौकट -
कोणाच्या तरी सांगण्यावरून हा निर्णय..
पाटबंधारे विभागाने कोणाच्या तरी सांगण्यावरून हा निर्णय घेतला आहे. आजच त्यांना कशी जाग आली आहे. कोरोनामुळे आम्ही पन्नासपेक्षा कमी लोक घेऊन हा जयंती सोहळा साजरा करणार होतो. ज्या राजर्षी शाहुंनी जनतेसाठी हे धरण बांधले. त्या धरणावर त्यांची जयंती साजरी करण्यास मनाई करणे हे निषेधार्ह आहे. बहुजन समाजाची जोडपी तेथे पूजन विधी सोहळा करणार होते. पण मी आणि माझी पत्नी जयंती साजरी करण्यासाठी जाणारच. प्रशासनाने काय कारवाई करायची ती करावी, समरजित घाटगे यांनी म्हटले आहे.