श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा २६ एप्रिल रोजी संपन्न होणार होती; परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या यात्रेचा प्रमुख धार्मिक विधी असणारा पालखी सोहळा गत वर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने न करता गाडीतून पालखी सोहळा करण्याचा निर्णय घेतला होता. जोतिबावरील ग्रामस्थांनी यावर्षी होणारा पालखी सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून पारंपरिक पद्धतीने पायरी टप्पा मार्गावरूनच काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात जोतिबा डोंगरावर शाहूवाडी उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. आज याच संदर्भात शाहूवाडी - पन्हाळ्याचे आ. विनय कोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या मागणीचा जोर धरला होता. ग्रामस्थांच्या मागणीनंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा करण्यास परवानगी दिली आहे. अशी माहिती जोतिबा डोंगर येथे यात्री निवासमध्ये घेतेल्या आढावा बैठकीत शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिली. यासाठी फक्त २१ मानकरीच पालखीबरोबर उपस्थित राहतील, अशी अट घातली आहे. २१ लोकांना आर.टी.पी.सी.आर. टेस्ट रिपोर्ट’, ओळखपत्र सक्तीचे केले आहे. गुलाल खोबऱ्यांची उधळण न करणे, पालखी मार्ग निर्मुष्य ठेवणे , पालखी सोहळ्याचे छायाचित्रणास मनाई करण्याच्या अटी घातल्या आहेत. पालखी मार्गावरील घर मालकांना ही कुटुंबाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस घर प्रवेश बंदीची नोटीस दिली जाणार आहे. शनिवार रात्रीपासून जोतिबा डोंगरावर नाकाबंदी करणार असल्याचे शाहूवाडी आणि करवीरचे पोलीस उपविभागीय अधिकारी आर. आर. पाटील यांनी सांगितले. चैत्र यात्रे दिवशी देवस्थान समितीमार्फत वेळेचे बंधन घालून दिलेल्या ओळखपत्रधारकांनाच मंदिर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती देवस्थान सचिव विजय पोवार यांनी दिली. प्रसार माध्यम यांना ही या दिवशी मंदिर प्रवेश बंदी केली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल जोतिबा ग्रामपंचायतीचे सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे , गावकर प्रतिनिधी यांनी समस्त पुजारी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. या बैठकीला पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोली पोलीस स्टेशनचे सपोनि. दिनेश काशीद , केदारलिंग देवस्थान समिती प्रभारी महादेव दिंडे , गावकर प्रतिनिधी उपस्थित होते.
कॅप्सन :- १) जोतिबा डोंगर येथे जोतिबा चैत्र यात्रा आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना शाहूवाडी - पन्हाळचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, सोबत पन्हाळचे तहसीलदार रमेश शेंडगे, करवीरचे पोलीस उपविभागीय अधिकारी आर. आर. पाटील, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार.