कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे माध्यमिक शाळा सकाळी साडेसात ते बारा या कालावधीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ही माहिती दिली. उद्या, सोमवारपासून ही कार्यवाही करण्याबाबतचे पत्रक सर्व शाळांसाठी काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षातील पहिल्या शैक्षणिक सत्राचे कामकाज कोरोनामुळे झाले नाही. नववी ते दहावीचे वर्ग २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवीचे वर्ग १२ जानेवारी २०२१ पासून सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने काही शिक्षक संघटनांनी सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे विनंती केली होती. याची दखल घेत उद्यापासून सकाळी साडेसात ते दुपारी बारा या कालावधीत माध्यमिक शाळा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. या वर्गाच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे अध्यापनाचे काम पूर्ण करणे अनिवार्य आहे. पाचवी ते नववी व अकरावी या वर्गाच्या सत्र २ च्या परीक्षा शाळेने घ्यावयाच्या असल्याने या वर्गातील सर्व विषयांचा शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे. यासाठी सकाळच्या सत्रात स्थानिक परिस्थितीस अनुसरून अध्यापनाच्या कामाचे तास वाढविण्यास हरकत नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
नवीन वेळ
सकाळी ७.३० ते १२
अन्यथा प्रशासकीय कारवाई
अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्यास आणि तक्रार प्राप्त झाल्यास आपणाविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्राद्वारे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे.