कोपार्डे : बालिंगा पूल धोकादायक असल्याचे कारण देत राष्ट्रीय महामार्ग विभागाने बंद केलेल्या वाहतूक पुन्हा सुरु करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. अवजड वाहने वगळून सुरक्षितता बाळगत हलक्या वाहनासह दुचाकीना पुलावरून वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिला मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढले. नदीची पाणीपातळी बालिंगा पुलाच्या स्प्रींज लेवलला पोहोचल्याने खबरदारी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. साबळेवाडी फाटा व नागदेवाडी फाटा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक बंद केली. ही वाहतूक साबळेवाडी, यवलुज, पाडळी बुद्रुक, प्रयागचिखली, आंबेवाडी, कोल्हापूर अशी वळवण्यात आल्याने लोकांना मोठा पल्ला ओलांडून यावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वी या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले तरी वाहतूक अडवण्याचा प्रकार झाला नव्हता.याबाबत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना थेट फोनवरून विनंती करून पुलावरील वाहतूक सुरू करण्याबाबत विनंती केली. राजेंद्र सूर्यवंशी यांनी बुधवारी आंदोलनाचा पवित्र स्वीकारला होता. आज पालकमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने चंद्रदीप नरके यांनी त्यांची भेट घेऊन वाहतुकीबाबत समस्या मांडून बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी खबरदारी बाळगून हलक्या व दुचाकी वाहनांना बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्याने साबळेवाडी फाटा व बालिंगे येथे लावण्यात आलेली बॅरिकेट्स हटवून वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या करवीर पन्हाळा गगनबावडा राधानगरी शाहूवाडी तालुक्यातील हजारो लोकांनी सुटकेचा निस्वास टाकला आहे.
Kolhapur: बालिंगा पुलावरुन वाहतुकीस परवानगी, पालकमंत्र्यांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 3:30 PM