इचलकरंजी : व्यंग शोधणे हे वात्रटिकेचे मर्म असते. ते शोधण्याचा स्वभाव असल्यामुळे अनेक राजकीय व्यक्ती व पक्ष यांच्यावर भाष्य करीत राहिलो. सत्तेत जे असतात, त्यांच्यावर टीका करताना अवघड असले तरी मी ते निखळपणे करू शकलो. त्यामागे व्यक्तिद्वेष नव्हता, असे प्रतिपादन प्रसिद्ध वात्रटिकाकार, कवी, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी केले.येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये रामादास फुटाणे बोलत होते. ते म्हणाले, ‘सामना’ या चित्रपटाच्या निर्मितीवेळी आम्ही सर्वांनी चांगली निर्मिती करण्याचा ध्यास घेऊन चित्रपट तयार केला. आर्थिक पाठबळ अपुरे असताना आणि नवखेपणाची मर्यादा ओलांडून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा व पुरस्कारास पात्र ठरला. मात्र, सुरुवातीला न चाललेला हा चित्रपट दोन वर्षांनंतर अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल झाला. चित्रपटाचा विषय आणि कलावंतांनी केलेला समर्थ अभिनय, तसेच चित्रपटाचे लेखन याच्या जाणीवेमुळेच प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्यामुळेच ‘सामना’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविला.राजकारणाविषयी ते म्हणाले, राजकारण हा वेगळाच विषय आहे. त्यामधील व्यूहरचना, शह-काटशह वेगळे असतात. त्याला कमालीची धार असते. कधी कुणाला विजयी करायचे आणि कुणाचा पराजय, हेही महत्त्वाचे होते. राजकारणाचा कोणताही लवलेश नसताना आणि विधानसभा सदस्य होण्याची अपेक्षा नसताना कॉँग्रेसचे विचार मला मनापासून आवडत असल्याने पक्षश्रेष्ठींनी विधानपरिषदेवर आपणाला कसे निवडून पाठविले, याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. श्यामसुंदर मर्दा यांनी स्वागत केले. प्रा. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. या व्याख्यानासाठी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही आपल्या चित्रपटातील आठवणी सांगितल्या. संजय होगाडे यांनी आभार मानले. इचलकरंजी येथील मनोरंजन-प्रबोधन व्याख्यानमालेत बोलताना कवी रामदास फुटाणे. यावेळी विलास रकटे उपस्थित होते.
वात्रटिका करताना व्यक्तिद्वेष ठेवला नाही
By admin | Published: May 18, 2016 12:41 AM