गारगोटी : गारगोटी येथे गेल्या दिड वर्षांपासून दारात वाळत टाकलेली कपडे चोरीला जात होतीत. मध्यरात्रीच्या वेळी हा विकृत मनोवृत्तीचा चोरटा अनेकांच्या घराच्या बाहेरील कपडे चोरत होता. न्यायालय परिसरात सोमवारी पहाटे चोरी करत असताना खुद्द न्यायाधीशांच्या सतर्कतेमुळे त्याला पाळत ठेऊन रंगेहाथ पकडले.सुशांत सदाशिव चव्हाण (वय ३५ ,रा.सोळांकूर ,ता राधानगरी ,जि. कोल्हापूर सध्या रा.सोनाळी-गारगोटी) असे या चोरट्याचे नाव आहे. भुदरगड पोलिसांत त्याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्याने साडे पाच हजाराची कपडे चोरून नेली आहेत.गेल्या दिड वर्षांपासून गारगोटी येथील अनेकांच्या घराबाहेर वाळत घातलेली कपडे विशेषतः महिलांची अंतर्वस्त्रे चोरीला जात होती. अनेकांनी कुत्र्याने दूर नेऊन टाकली असतील, शेजाऱ्यांचेच हे काम असावे. यातून अनेक शंका कुशंका निर्माण होऊन गल्लीत शेजाऱ्यांशी वाद होत होते. पण चोरी किरकोळ व कपड्यांची असल्यामुळे त्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. या संधीचा फायदा घेऊन हा चोरटा मात्र ही कपडे चोरून ती दूर नेऊन टाकत होता. न्यायालय परिसरात डिसेंबर महिन्यात तीन आणि एकवीस तारखेला तर जानेवारी महिन्यात आठ तारखेला कपडे चोरीला गेलीत. या घटना वारंवार घडू लागल्यामुळे न्यायालय कर्मचारी व खुद्द न्यायाधीशांनीच परिसरात खास सी सी टीव्ही कॅमेरे लावले.त्यातून चोरटा समजून आला.पण त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी खुद्द न्यायाधीशांनीच त्याच्यावर पाळत ठेवली.आज सोमवारी (दि १७)रोजी पहाटे पाचच्या सुमारास संरक्षक भिंतीवरून उडी मारून चोरटा पुन्हा न्यायालय परिसरात चोरी करण्यासाठी आला असता खुद्द न्यायाधीश यांच्या सतर्कतेमुळे न्यायालय कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि भुदरगड पोलिसांच्या हवाली केले. याबाबतची फिर्याद गारगोटी न्यायालय कर्मचारी रंगराव हरी चांदम(रा राधानगरी) यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे. या चोरट्यास पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चोरटा एका खासगी दवाखान्यात नोकरीसहा चोरटा गारगोटी येथील स्टँड परिसरातील एका प्रसिद्ध खासगी दवाखान्यात नोकरीस आहे, कमी दरात हा घरी सुध्दा रुग्णांवर उपचार करतो असे समजते, परंतु अफलातून चोरी तीही फक्त कपड्यांची करणाऱ्या कपडेचोर मनोरुग्ण चोरट्याची आज गारगोटीत दिवसभर खुमासदार चर्चा सुरू होती.
सुरक्षा रामभरोसेगारगोटी येथील दिवाणी न्यायालयाचे आवारात न्यायालय, व न्यायाधीश निवासस्थान आहे, या भोवती संरक्षक भिंत आहे, पण ती कांही ठिकाणी ढासळली आहे, त्यामुळे न्यायालयाची सुरक्षाच रामभरोसे झाली आहे. त्याचाच फायदा घेऊन चोरटे आत शिरतात, त्यामुळेच अशा चोरीच्या घटना घडत असून न्यायालय परिसराची संरक्षक भिंत बांधून त्याची उंची वाढवण्याची आवश्यकता असलेची चर्चा सुरू आहे.