सुहास जाधव - पेठवडगावभाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व डॉ. चौगुले यांच्या पक्षप्रवेशास चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे इचलकरंजी शहर वगळता तालुक्यात जनाधार नसल्याची टीका होणाऱ्या भाजपने जनाधार दाखवून स्वबळावर आगामी पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे रणशिंग फुंकले. यामुळे वडगावसह तालुक्याची राजकीय समीकरणे नव्याने उदयास येणार आहेत.पेठवडगाव शहरात रविवारी आयोजित कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत वडगावसह जिल्ह्याच्या सहकारक्षेत्रात ठसा उमटविलेले डॉ. ए. एम. चौगुले, डॉ. अशोक चौगुले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश पार पडला. आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता भाजपकडे प्रवेशासाठी रांग लागल्याचे चित्र दिसत आहे.डॉ. ए. एम. चौगुले यांची १९५७ पासून कारकीर्द पाहता त्यांनी व त्यांच्या मुलांनी वडगाव ही कर्मभूमी मानली आहे. अर्बन बँक, हातकण्ांगले सूतगिरणी आदींची स्थापना केलेली आहे. त्या चालविल्या आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कधी आघाडी, स्वतंत्रपणे निवडणुका लढवून गटाचे अस्तित्व कायम ठेवले आहे.या कार्यक्रमातही इतरवेळी विरोधकांवर खास पध्दतीने टीकास्त्र सोडणाऱ्या डॉ. अशोक चौगुले यांनी आपल्या भाषणात कोणावरही टीका केली नाही. केवळ शहराच्या विकासाचे प्रश्न मांडले. ते पूर्ण करण्याची हमी घेण्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले. येत्या काळात पालिकेतील सत्ताधारी आघाडी विरोधात बाकीचे गटतट आहेत. मात्र भाजपने डॉ. चौगुले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्यामुळे पालिका निवडणुकीत वेगळे चित्र असण्याची शक्यता आहे.ज्या पद्धतीने भाजपने डॉ. चौगुले यांच्यावर विश्वास टाकून प्रवेश व जबाबदारी दिली. ती जबाबदारी तितक्याच नेटाने पार पाडून भाजप नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविणे गरजेचे आहे. तसेच पक्षाने त्यांना ज्या मुद्यावर प्रवेश दिला त्या वडगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. या मेळाव्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिलाच पक्षप्रवेश असल्याने भाजपचे शक्तीप्रदर्शन किंवा वातावरण निर्मिती एवढाच अर्थ सध्यातरी स्पष्ट होत आहे. यामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
पेठवडगाव परिसरात भाजपला अच्छे दिन येणार?
By admin | Published: April 25, 2016 10:10 PM