कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लुटमार, मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत कोल्हापुरात सोमवारी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध केला. गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी होईपर्यंत विविध टप्प्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी कॉंग्रेसकडून करण्यात आला.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली आहे. या महागाईविरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, राज्यभर आंदोलन सुरू आहे. याअंतर्गत कोल्हापुरातील कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, जयंत आसगावकर आणि जिल्हा कॉंग्रेसचे प्रभारी निरीक्षक संजय बालुगडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कोल्हापूर जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या प्रवेशव्दारात निदर्शने केली.
बालुगडे यांनी आंदोलनात टांगा सहभागी करून महागाईचा निषेध केला. यावेळी निषेधाचे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. या आंदोलनात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, सचिन चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लाणी, संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, सरलाताई पाटील, लीला धुमाळ, हेमलता माने, संजय मोहिते, संपतराव चव्हाण, दीपक थोरात, प्रवीण पाटील, प्रशांत गणेशाचार्य, आनंदा करपे, वैभव देसाई, आदी सहभागी झाले होते.दरम्यान, महागाईविरोधात तालुकापातळीवर सायकल रॅली, चूल पेटवून निषेध करणारे आंदोलन करण्यात येत असल्याचे संजय पोवार-वाईकर यांनी सांगितले.