लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी जाहीर केल्यामुळे टाळेबंदी,मालवाहतुकीवर मर्यादा, पर्यटन बंद झाले. त्याचा परिणाम इंधन विक्रीवर झाल्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा खप निम्म्यावर आला आहे. गेल्या १६ दिवसात विक्री ५० टक्क्यांनी घटली.
जिल्ह्यात ३१५ हून अधिक पेट्रोल पंपाद्वारे पेट्रोल, डिझेल वितरित केले जाते. दिवसाला सुमारे सव्वासहा लाख डिझेल, तर साडेपाच लाख लिटर पेट्रोल विक्री होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य शासनाने १० व ११ एप्रिल २०२१ ला पहिले दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन केला. त्यानंतर १५ एप्रिलपासून आजतागायत संचारबंदी जाहीर केली आहे. या १६ दिवसांचा विचार करता पेट्रोल व डिझेलची विक्री निम्म्यावर आली आहे. पेट्रोल २ लाख ७५ हजार, तर डिझेल ३ लाख लिटरवर आली आहे. अशीच परिस्थिती पहिल्या लॉकडाऊन काळातील १४० दिवसांमध्ये ही होती. त्यानंतर उर्वरित २२५ दिवसांमध्ये ही विक्री पूर्ववत झाली होती. आता पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी वाढणार आहे. तर दरातही वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
चौकट
जिल्ह्यात आजमितीला सुमारे १० लाख दुचाकी, तर अवजड व चारचाकी मिळून ४ लाख ५० हजार असे एकूण १४ लाख ५० हजार वाहने आहेत. या सर्व वाहनधारकांसह औद्योगिक वापरासाठी दिवसाकाठी ५.५० लाख लिटर पेट्रोल, तर ६ लाख २० लिटर डिझेल लागते. त्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात २२ कोटी ६३ लाख लिटर डिझेल, तर २० कोटी ७ लाख ५० हजार लिटर पेट्रोलचा खप होतो. आता मात्र, लॉकडाऊनमुळे यात घट झाली आहे.
कोट
संचारबंदीमुळे उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. पश्चिम बंगालची निवडणुका झाल्यानंतर इंधन दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
- गजकुमार माणगावे, अध्यक्ष , कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असोसिएशन