लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कुठे बैलगाडीला फुगे बांधले होते, लेझीमवर मुला-मुलींनी ठेका धरला होता, सर्वच ठिकाणी गोडधोड खायला केले होते. नवी कोरी पुस्तकं दिली होती. अशा उत्साही वातावरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी‘ शाळा प्रवेशोत्सव’ केला. अनेक गावांमध्ये मान्यवर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावत मुला-मुलींचे स्वागत केल्याने वेगळेच वातावरण गावोगावी निर्माण झाल्याचे दिसत होते. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटांतील सर्व बालकांची नियमित शाळेत १०० टक्के पटनोंदणी होण्यासाठी तसेच एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या प्रथमदिनी ‘शाळा प्रवेशोत्सव’कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या शाळाभेटींचे नियोजन केले होते. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रथम दिनानिमित्त शाळेत हजेरी लावून इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत केले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी संजीवन वि. मं. चंदूर (ता. हातकणंगले) , आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी वि. मं. मिणचे (ता. हातकणंगले), आमदार उल्हास पाटील यांनी कन्या वि. मं. दत्तनगर (ता. शिरोळ), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कुमार व कन्या वि. मं. (गडमुडशिंगी, ता. करवीर), उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी कुमार वि. मं. (कळे, ता. पन्हाळा), शिक्षण सभापती अंबरिष घाटगे यांनी वि. मं. गलगले (ता. कागल), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी कन्या वि. मं. वाकरे (ता. करवीर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी वि. मं. कोथळी (ता. करवीर), शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी कुमार व कन्या वि. मं. कुंभोज (ता. हातकणंगले) यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत, मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ दिले.
‘त्या’ पेट्रोलियम टोळीचा मोबाइल ‘स्वीच आॅफ’
By admin | Published: June 16, 2017 12:29 AM