कोल्हापूर : खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर हक्काच्या भविष्य निर्वाह निधीसाठी (पीएफ) यापूर्वी खोळंबून राहावे लागत होते. आता मात्र त्यांना निवृत्तीदिवशीच किंवा त्याआधीच हा निधी देण्याचा निर्णय ‘एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन’ने घेतला आहे. ‘पीएफ’च्या कोल्हापुरातील कर्मचारी-सदस्यांसाठी ही शुभवार्ताच आहे. त्यामुळे पाच जिल्ह्यांच्या परिक्षेत्रातील या अंतर्गत येणाऱ्या सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा महिन्याकाठी लाभ होणार आहे. कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत ७००० आस्थापना आहेत. त्यांमध्ये सुमारे साडेसात लाख कर्मचारी सदस्य कार्यरत आहेत. २० पेक्षा जास्त कर्मचारी व त्याहून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या आस्थापनांना कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडणे सक्तीचे आहे. या आस्थापनांतून दर महिन्याला किमान सातशे कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यामुळे या ‘पीएफ’च्या निर्णयाचा लाभ या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय स्तरावर ‘ईपीएफ’च्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता सर्व क्षेत्रीय कार्यालयांत त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. निर्णय जरी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी होऊन तत्काळ निधी हाती पडणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी अपुऱ्या कागदपत्रांमुळे व काही त्रुटींमुळे महिनोन्महिने कर्मचाऱ्यांना हा निधी मिळत नव्हता. कागदपत्रे पूर्ण नसल्यास दावे परत जातात. याकरिता कागदपत्रे पूर्ण नसल्यास त्या आस्थापनेला व सदस्यांना स्मरणपत्रे पाठविली जातात. या निर्णयामुळे जे आता काही महिन्यांतच निवृत्त होणार आहेत व जे निवृत्त झाले आहेत; मात्र त्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही, अशा सदस्यांसाठी ही शुभवार्ताच असल्याने स्वागत होत आहे. ‘पीएफ’साठी हवीत ही कागदपत्रे मुलांचे जन्मदाखले सदस्य मृत असेल तर त्याचा दाखला व हयात असेल तर जन्मदाखला पत्नी व सदस्यांचे प्रत्येकी तीन पासपोर्ट फोटो मुलांचे स्वतंत्र तीन फोटो मुले २५ वर्षांच्या आतील असतील तर बँकांची पासबुक झेरॉक्स सदस्यांच्या पश्चात लिस्ट आॅफ सर्व्हायव्हिंग मेंबर (एलएसएम सर्टिफिकेट) अर्ज भरून देणे आवश्यक आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक जन्म व मृत्यू नोंदणीच्या सत्य प्रती कर्मचारी ज्या आस्थापनेत सेवा बजावत असेल, त्या आस्थापनेच्या मालक, जबाबदार अधिकारी किंवा संचालकांकडून सर्व कागदपत्रे साक्षांकित करून देणे बंधनकारक स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक या पाचपैकी एका बॅँकेत खाते असणे आवश्यक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत २० पेक्षा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या सुमारे ७००० आस्थापना कार्यरत आहेत. पाच जिल्ह्यांत एकूण ७,५०,००० कर्मचारी सदस्यांची नोंदणी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शुभवार्ताच म्हणावी लागेल
सातशे कर्मचाऱ्यांना निवृत्तीदिवशीच पीएफ
By admin | Published: November 04, 2016 12:38 AM