कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला गेल्या वर्षअखेरपर्यंत सादर झालेले एकूण ३४९६ शोधप्रबंध ‘इन्फ्लिबनेट’च्या‘शोधगंगा’ या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून बुधवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत या प्रबंधांचे औपचारिक लोकार्पण होणार आहे, अशी माहिती ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी दिली.या ज्ञानस्रोत केंद्राकडे उपलब्ध असणाऱ्या सन १९६४ पासून २०१८ पर्यंतच्या ३४९६ पीएच. डी. प्रबंधांचे डिजिटायझेशन करून ते ‘इनफ्लिबनेट’च्या ‘शोधगंगा’ या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत. विद्यापीठात झालेले संशोधन संशोधक, अभ्यासकांना उपयोगी पडावेत, या हेतूने विद्यापीठाने अहमदाबादच्या इन्फ्लिबनेट सेंटरशी २१ सप्टेंबर २०११ रोजी सामंजस्य करार केला. त्यांच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सन २०१२ मध्ये विद्यापीठाच्या डिजिटायझेशन प्रकल्पासाठी १९ लाख २६ हजार ६५० रुपयांचे अनुदान देण्यात आले.‘शोधगंगा’ या संकेतस्थळावर प्रबंध विषयनिहाय पाहणे, वाचणे, डाऊनलोड करून घेणे, आदी सुविधा ज्ञानस्रोत केंद्राच्या संदर्भ विभागाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. या डिजिटायझेशनचे काम गुरगावच्या ‘प्रो-क्वेस्ट’ या संस्थेने केले आहे; त्यासाठी उपग्रंथपाल डॉ. डी. बी. सुतार, साहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी. बी. बिलावर, वरिष्ठ ग्रंथालय साहाय्यक डॉ. राजेंद्र खामकर, मदतनीस रवींद्र बचाटे यांची मदत झाल्याचे डॉ. खोत यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यापीठाकडील संशोधकीय ज्ञान जगभरातील संशोधकांना आता खुले झाले आहे. विद्यापीठात गेल्या ५५ वर्षांत विविध विषयांवर मौलिक संशोधन झाले आहे. त्याचा नवसंशोधकांना संदर्भसाहित्य म्हणून मोलाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अशाप्रकारे सर्व शोधप्रबंध अपलोड करणारे शिवाजी विद्यापीठ हे तिसरे विद्यापीठ ठरले आहे.- डॉ. देवानंद शिंदे,कुलगुरू