गारगोटी (प्रतिनिधी) : पाटगाव ता भुदरगड येथील मौनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून सहाशे त्रेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.काल पासून आणि आज दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिला आहे.
भुदरगड व कागल या तालुक्यासह कर्नाटक सीमावासीयांसाठी वरदान ठरलेल्या पाटगाव (ता. भुदरगड) येथील मौनीसागर जलाशय परिसरासह तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणाच्या सांडव्यातून ३९३ क्युसेक तर वीज निर्मितीसाठी (पॉवर हाऊस) २५० क्युसेक असा एकत्रित ६४३ क्युसेक पाणी विसर्ग सुरु आहे.
आजपर्यंत यावर्षी मौनीसागर जलाशय (पाटगाव धरण) परिसरात ४३०१ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गतवर्षी १७ सप्टेंबरपर्यंत ३८०० मी. मी. पावसाची नोंद झाली होती. या वर्षी तब्बल ५०१ मी. मी. जादा पावसाची नोंद झाली आहे. भुदरगड तालुक्याची जीवनदायिनी समजल्या जाणा?्या पाटगाव येथील मौनीसागर जलाशय या धरण क्षेत्रात गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. कालच्या चोविस तासात धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वहात आहे
.हे धरण गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी भरले होते. या वर्षी आॅगस्ट मध्येच धरण भरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु पावसाने अचानक दडी मारल्याने यंदा अठरा सप्टेंबरला पूर्ण धरण भरले म्हणजे गतवर्षी पेक्षा सहा दिवस अगोदर. सध्या पूर्ण भरलेले धरण पाहण्यासाठी हौसी पर्यटकांची पावले पाटगाव येथील मौनीसागर जलशयाकडे वळत आहेत. त्याचबरोबर सरत्या पावसाचा आनंद काही वर्षाप्रेमी घेत आहेत.