आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0३ : सामाजिक बांधीलकीचे व्रत जपलेल्या ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे सोमवारी आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधीलकीतून रक्तदानाद्वारे नवी नाती या निमित्ताने जोडताना दिसली. दिवसभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह, युवक, वृत्तपत्र विक्रेते, नागरिक व ‘लोकमत’मधील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
शाहुपुरी तिसरी गल्ली येथील राधाकृष्ण मंदीर हॉल येथे ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाला अर्पण ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
शिबिराचे उद्घाटन अर्पण ब्लड बॅँकेचे डॉ. बी. जी. कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, युवा आॅर्गनायझेशनचे मंदार तपकिरे, राधाकृष्ण मंदिराचे हॉल व्यवस्थापक डी. आर. कोडोलीकर प्रमुख उपस्थित होते.
‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ मानले जाते; कारण आयुष्यात दान-धर्म करून जेवढे पुण्य लाभत नाही, तेवढे रक्ताद्वारे एखाद्याला जीवदान दिल्याने लाभते. रक्तदान ही एक चळवळ असून तिला बळ देण्यासाठी ‘लोकमत’ या शिबिराचे आयोजन करण्यात येते. सकाळी साडे दहाच्या सुमारास रक्तदानाला सुरुवात झाली.
दिवसभरात महाविद्यालयीत विद्यार्थी, तरुण, वृत्तपत्र विक्रेते, नागरिक, लोकमतचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने ‘लोकमत’ने सामाजिक जाणीवेची वीण अधिक घट्ट करुन अनेक धाग्यांना एकत्रित जोडण्याचे काम केले. सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित रक्तदात्यांनी गौरवोद्गार काढले.
या शिबिरास अर्पण ब्लड बॅँकेचे बाबासाहेब आघाव, पूनम आघाव, करिष्मा जमादार यांचे सहकार्य लाभले.