कोल्हापूर : मोबाईलचे पोस्टपेड बिल भरून ते न मिळाल्याने गुगलवर फोन पे कस्टमर केअर सेंटरचा नंबर शोधून काढला खरा परंतू त्या नंबरवर फोन केल्यावर एका ग्राहकाला ५३० रुपयांच्या बिलापोटी तब्बल २२ हजार २२० रुपयांचा गंडा बसला. घामाचे पैसे असे फुकापासरी गेल्याने सामान्य शेतकरी कुटुंबातील या व्यक्तीच्या पत्नीला दोन दिवस अन्न गोड लागले नाही. याबध्दल कोल्हापूर पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार करण्यात आली.घडले ते असे : या ग्राहकाचे मोबाईल नेटवर्क आयडियाचे. पोस्टपेड बिल होते फक्त ५३० रुपये. ते फोन पे ॲपद्वारे भरलेही..बँक ऑफ इंडियाचा तसा मेसेजही आला. परंतू तरीही मोबाईल सुरु झाला नाही म्हटल्यावर आयडिया केअर सेंटरला तक्रार केली. त्यांनी सांगितले की तुम्ही फोन पेकडे तक्रार करा. गुगुलवरून फोन पे कस्टमर केअर नंबरचा शोध घेतला. त्यावर फोन केल्यावर लगेच मोबाईल क्रमांक ७०४४४०४२०१ वरून फोन आला.
त्यांने सांगितले की तुमचे पैसे खात्यावर जमा होतील, सर्व्हरची समस्या आहे. त्यासाठी फोन पे मध्ये जावून एनी डेस्क ॲप घ्या. तो घेतल्यावर त्यांनी ९९९९ हे आकडे दाबायला सांगितले. त्यावेळी ग्राहकाच्या हे लक्षात आले की त्यातून आपले पैसे जाणार आहेत. त्यांनी तसे त्या व्यक्तीला सांगितलेही परंतू त्यांने सांगितले की हे सर्व पैसे तुमच्या खात्यावर परत जमा होणार आहेत. आणि तुम्हांला ट्रान्जेक्शन फेल्डचा मेसेज येईल.
तसा मेसेज आल्यामुळे आपले पैसे गेले नाहीत या आनंदात या व्यक्तीने दोनवेळा ९९९९ व शेवटी २२२२ असे आकडे मोबाईवर टाईप केले व त्यांना एकत्रित २२ हजार २२० रुपयांना गंडा बसला. थोड्यावेळातच त्यांना बँक अकौंटवरून पैसे गेल्याचे मेसेज आले. संबंधितांने त्यानंबरवर फोन केले परंतू तो आता कोण उचलत नाहीत. गंमत म्हणजे त्यांचे मोबाईल नेटवर्क मात्र त्याचवेळी लगेच सुरु झाले आहे.गुगलवर अवलंबून..आपण हल्ली कांही माहिती हवी असेल तर गुगलवर जावून सर्च करतो. तिथेही अशी फ्रॉड ॲप असून त्याद्वारे आपली फसवणूक होवू शकते. त्यासाठी पुरेशी दक्षता बाळगणेच हेच आपल्या हातात आहे.