थोरपुरषांचे फोटो पूजन, संविधान वाचन आणि आई-वडिलांच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश
इचलकरंजी : थोरपुरुषांचे फोटो पूजन, संविधानाचे वाचन आणि आई-वडिलांच्या हस्ते फीत कापून गृहप्रवेश करत साऱ्या बहुजन समाजाने अनुकरण करण्यासारखा वास्तुशांती कार्यक्रम येथील सहाय्यक शिक्षक रवींद्र गुरव यांनी केला. मन:शांती हीच खरी वास्तुशांती, असे मानून स्वत:च्या मनाला पटणारे, भावणारे त्याचबरोबर त्यातून समाजाला दिशा देणारे काम करत गुरव यांनी वेगळ्या पद्धतीने वास्तुशांतीचा कार्यक्रम केला. पारंपरिक होमहवन, त्यासाठी लागणारी पूजेची सामग्री, जेवणावळी, वास्तुदोष निवारण, पूजा या सर्वाला फाटा देत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर या थोरपुरुषांचे फोटो पूजन केले. त्यांना अभिवादन करून मोजक्याच उपस्थित असलेल्यांमध्ये संविधानाचे वाचन केले आणि कष्टातून शिक्षण दिलेल्या आपल्या आई-वडिलांच्या हस्ते फीत कापून गृहप्रवेश केला. या सर्वाला फाटा दिल्यामुळे वाचलेल्या रकमेतून दोन सामाजिक संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत निधी दिली. केवळ भाषणबाजी न करता प्रत्यक्षात केलेल्या या कृतीबद्दल रवींद्र गुरव आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकांनी धन्यवाद दिले. त्यांचे अभिनंदनही केले. यातून बोध घेऊन समाजातील अनावश्यक कालबाह्य कर्मकांडांना मूठमाती देऊन समाज जागृती घडवावी, असे हे कार्य आहे.
रवींद्र गुरव यांचे मूळ गाव कोनवडे (ता. भुदरगड) आहे. ते सध्या इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. इचलकरंजीतील आमराई रोड परिसरात नुकतीच त्यांनी टु-बी एचके सदनिका घेतली. त्यामध्ये पत्नी व मुलासह ते वास्तव्यास आहेत. रविवारी (दि.२१) त्यांच्या या सदनिकेची वास्तुशांती विधायक पाऊल उचलत वेगळ्या पद्धतीने केली.
यावेळी शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई, गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार, अशोक जाधव, चित्रकार ए. ए. कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गौतम कांबळे, आदींसह शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
चौकट
विवाहही विधायक पद्धतीनेच
गुरव यांनी विवाहही अशाच पद्धतीने कर्मकांडाला फाटा देत केला. त्यावेळी वरातऐवजी व्याख्यान ठेवून प्रबोधन केले. त्यांच्या पुरोगामित्वाचा जागर मांडण्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो ओळी
२३०२२०२१-आयसीएच-१०
इचलकरंजीत सहाय्यक शिक्षक रवींद्र गुरव यांनी वास्तुशांतीच्या खर्चाला फाटा देत दोन सामाजिक संस्थांना मदतनिधी दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, डॉ. सुभाष देसाई, गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार, अशोक जाधव, चित्रकार ए. ए. कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गौतम कांबळे उपस्थित होते.