सागर चरापले
फुलेवाडी : फुलेवाडी भगवा चौक ते कळंबा साई मंदिर हा रिंग रोड नगरोत्थानमधून ६० फुटी करण्यात आला. रस्ता चांगला झाल्याने अवजड वाहने तसेच दुचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यावरून सुसाट जात असतात. रस्त्याच्या दुतर्फा अनेक कॉलनी, वसाहती असल्याने वाहनांसह नागरिकांची वर्दळ असते. रिंग रोडवरून जाणारी वाहने सुसाट असल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. यासाठी महापालिकेने रिंगरोड अपघात होण्यापूर्वी दुभाजक उभा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
सध्या अवजड वाहनांना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत शहरात प्रवेश दिला जात नाही. या वेळेत अवजड वाहने रिंग रोडमार्गे धावत असतात. रस्ता चांगला असल्याने भरधाव वेगाने अवजड वाहने चालवली जातात. त्याचबरोबर दुचाकी, चारचाकी वाहने सुसाट असतात. परिणामी अपघात होण्याचा धोका कायम असतो.
रिंगरोडवरती संध्याकाळी बोंद्रेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे रस्त्यावरतीच भाजी विक्री केली जाते. दरम्यान, भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. तर सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातून अपघात घडण्याची शक्यता असून वाहनांना शिस्त लागण्यासाठी दुभाजकाची गरज आहे.
प्रतिक्रिया
... महानगरपालिकेने रिंग रोडवरती दुभाजक लवकरात लवकर घालण्याची गरज आहे. अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. शक्य झाल्यास सिमेंट, स्टील कंपन्यांनी पुढे येऊन लोखंडी दुभाजक बसविण्यास महापालिकेस
हातभार लावावा.
-अभय तेंडुलकर, उपाध्यक्ष कोल्हापूर युथ फाऊंडेशन
प्रतिक्रिया
लहान मुलांच्यासह महिलांना रस्ता ओलांडून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अवजड तसेच तरुणांची वाहने भरधाव असल्याने अपघाताची शक्यता कायमच असते.
- विजयसिंह देसाई, बोंद्रे नगर