लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील न्यू मिलिनियम पब्लिक इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचा फी न भरल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे. या गैरप्रकाराची शासनाने दखल घ्यावी, अशा मागणीचे निवेदन पालकांनी प्रांत कार्यालयात दिले.
फी न दिल्याने विद्यार्थ्यांना बेंचवरून खाली बसवणे, परीक्षा देण्यासाठी पुरवणी न देणे व स्वच्छतागृह वापरण्यास बंदी घालणे असा त्रास मुख्याध्यापकांकडून दिला जात आहे. तसेच शंभर टक्के फी दिली नाही, तर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याची धमकी पालकांना देणे, पालकांशी गैरवर्तन करणे, असे प्रकार घडत आहेत. यावर शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे निवेदनात,म्हटले आहे.
शिष्टमंडळात श्रीकांत बागडे, विनायक पाटील, अशोक शेळके, इम्तियाज शेख, सचिन चौगुले आदींचा समावेश होता.