जयसिंगपूर : गेल्या तीन वर्षांत दिलेली आश्वासने शासनाने पूर्ण केलेली नाहीत. केवळ प्रसारमाध्यमांमधून विकासकामांचे चित्रच निर्माण केले जात आहे. येत्या दोन वर्षांनंतर पुन्हा निवडणुका होतील. मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या धोरणाला संपूर्ण देश पाठिंबा देईल, या भ्रमात राहू नये. मोदी सरकार पुन्हा निवडून आले, तर ते त्यांच्या भ्रमातच निवडून येतील, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. येथील नवा महाराष्ट्र परिवाराच्या वतीने स्व़ डॉ़ सा़ रे़ पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री बी. जे. खताळ-पाटील यांना यावर्षीचा राज्यस्तरीय स्व़ डॉ़ आप्पासाहेब ऊर्फ सा़ रे़ पाटील समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला़ ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते रोख १ लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन खताळ-पाटील यांचा गौरव करण्यात आला़ स्व़ सा़ रे़ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ येथील नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावर हा कार्यक्रम सोहळा पार पडला़ स्वागत नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांनी केले. पुरस्कार निवड समिती अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी स्व. सा. रे. पाटील यांच्या जीवनाचा आढावा घेतला. मानपत्र वाचन किशोर रक्ताडे यांनी केले. यावेळी केतकर म्हणाले, राजकारण व मीडिया हा सैतानी संगम आहे. यातून तुम्ही जे वाचाल, पाहाल, ऐकाल ते सत्य असेल असे नाही. तसेच सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका, मीडिया समजून घ्या. पंडित नेहरूंचे विचार संपविण्याचा जणू विडा उचलण्यात आला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, योजना मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या दोन वर्षांत त्या कागदावरच मोडीत निघतील. मात्र, जनतेच्या मनातून निघणार नाहीत. नेहरू घराण्याने कधीही घराणेशाही केली नसताना सध्या मात्र घराणेशाहीच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. खताळ यांचा इतिहास पाहता त्यांच्या जीवनातील इतिहासाचे आत्मचरित्र लिहिले पाहिजे. खताळ यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुरस्कारासाठी मिळणे कठीण आहे. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, उद्योगपती अशोक कोळेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, राजाभाऊ शिरगुप्पे, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम, पं. स. सभापती मल्लाप्पा चौगुले, उपसभापती कविता चौगुले, पं. स. सदस्य मीनाज जमादार, मीनाक्षी कुरडे, एम. व्ही. पाटील, सर्जेराव शिंदे यांच्यासह सा. रे. पाटील कुटुंबीय उपस्थित होते़ नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पुरस्काराची रक्कम सेवाभावी संस्थेलासत्कारमूर्ती बी. जे. खताळ-पाटील म्हणाले, अनेक पुरस्कार १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला दिले जातात, पण सा. रे. पाटील यांच्या स्मृतिदिनी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मोल मोठे आहे. कोणत्याही शिफारशीशिवाय दिला गेलेला पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी खताळ यांनी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम सेवाभावी संस्थेला द्यावी, असे सुचविले.
माध्यमांतूनच विकासकामाचे चित्र
By admin | Published: April 02, 2017 12:46 AM