कोल्हापूर : राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, रंकाळा, सह्याद्रीच्या रांगा यासह ग्रामीण भाग आपल्या कुंचल्यातून साकारल्याने १९७० ते ९० च्या दशकातील कोल्हापूरचा निसर्गच चित्रकार एम. आर. देशमुख यांच्या चित्रातून उमटला आहे. चित्रातून साकारलेला हा आविष्कार पाहण्यासाठी कलारसिकांनी रविवारी गर्दी केली होती.सुप्रसिद्ध चित्रकार एम. आर. देशमुख यांच्या चित्रप्रदर्शनाला शाहू स्मारक भवन येथे रविवारी सुरुवात झाली. ९ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. याची सुरुवात ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात, उषा थोरात, ज्येष्ठ चित्रकार शामकांत जाधव, एम. आर. देशमुख, जी. एस. माजगावकर, जे. जे. स्कूल आॅफ आर्टस्चे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, शिल्पकार संजीव संकपाळ, अतुल डाके, अर्चना देशमुख-माने, आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यशवंतराव थोरात यांनी या प्रदर्शनाचे कौतुक करत अशी चित्रे म्हणजे आताच्या पिढीला पर्वणीच असल्याचे सांगितले.प्रदर्शनात चित्रकार देशमुख यांची ५० चित्रे आहेत. ही चित्रे १९७० ते ९० या काळातील असून, देशमुख यांच्या चित्रशैलीवर शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांचा प्रभाव राहिला आहे. चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, रंकाळा, सह्याद्रीच्या रांगा यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील खेडी व साताऱ्यातील निसर्ग उमटला आहे. हे प्रदर्शन ९ तारखेपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. पहिल्या दिवशी कलारसिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.