लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणाने उकळी घेतली असली तरी २० एप्रिलला माघारीनंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेकजण अद्याप तळ्यात मळ्यात आहेत, उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा वेगळा विचार करणाऱ्यांची संख्या कमी नाही, त्यामुळे निवडणुकीचे आताच आडाखे बांधणे कठीण होणार आहे. ठरावधारकही नेत्यांप्रमाणेच सोयीची भूमिका घेत असून प्रत्येकाला मी तुमचाच, असे सांगत असल्याने इच्छुकही चांगलेच गोंधळून गेले आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात उत्सुकता लागली आहे. कोण कोणाबरोबर राहणार, शहकाटशहाच्या राजकारणात ‘गोकुळ’च्या पटलावर राजकीय मोहरे कोण कसे सरकवणार, याभोवतीच निवडणूक फिरणार आहे. विरोधी गटाने मोट बांधली आहे. सत्तारूढ गटानेही शत्रूचा शत्रू ते आपले मित्र म्हणून भक्कम बांधणी करण्यास सुरुवात केली असली तरी माघारीनंतरच खरे चित्र समोर येणार आहे. अजूनही काहीजण तळ्यातमळ्यात आहेत. माघारीनंतरच हे सगळे भूमिका स्पष्ट करणार असल्याने रुसव्या फुगव्यामुळे आताच निवडणुकीचे आडाखे बांधणे कठीण आहे.
सगळेच इच्छुक ठरावधारकांच्या दारात जात आहेत. नेते जसे सोयीची भूमिका घेतात, त्याप्रमाणेच ठरावधारकही मी तुमचाच, असे सांगत असल्याने इच्छुकही चांगलेच गोंधळून गेले आहेत.
सहानुभूती कोणाच्या पदरात पडणार
कोणत्याही निवडणुकीत सहानुभूती महत्त्वाची ठरते. केवळ सहानुभूतीच्या बळावर अनेक निवडणुका मारल्याचा कोल्हापूरचा इतिहास आहे. मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांचा नुकताच विधानसभेला पराभव झाला होता, त्यात जिल्ह्यातील सगळे दिग्गज एका बाजूला झाले होते. प्रस्थापितांविरोधात ते एकटेच उभे राहिल्याने जवळपास अडीच हजार ठरावधारक सत्तारूढ गटासोबत असताना पाटील यांच्या पॅनलने दोन जागा जिंकत १४०० मतांपर्यंत मजल मारली होती. यामागे सहानुभूतीचा अंडरकरंट हाेता, हे कोणीही नाकारू शकत नाही. यावेळेला परिस्थिती वेगळी आहे. गेली पाच वर्षे ‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात सतेज पाटील आक्रमक राहिले, मल्टीस्टेट, नोकरभरतीसह इतर विषय घेऊन ते सामोरे जातील, असे वाटत होते. मात्र, त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेत्यांची मोट बांधत आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडीक यांना एकाकी पाडण्याचा त्यांना प्रयत्न आहे. हा प्रयत्नच सहानुभूतीच्या रूपाने आमदार पाटील व महाडीक यांच्या पथ्यावर पडेल, अशी चर्चा आहे.