कोल्हापूर : विधान परिषदेसाठी काँग्रेसची उमेदवारी आज, सोमवारी दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. उमेदवारीसाठी माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना यांच्या राज्यातील जागावाटपामध्ये कोल्हापूरची जागा भाजपच्या पारड्यात पडल्याने ‘काँग्रेस विरुद्धभाजप’ अशीच सरळ-सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, तर या निवडणुकीत सर्वाधिक मतदान असलेल्या राष्ट्रवादीनेही कॉँग्रेसवरील आपले दबावतंत्र कायम ठेवले असून, पक्षाचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर हे देखील आज अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवर सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांनी दावा केला आहे. उमेदवारीसाठी चौघाही इच्छुकांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांचे संख्याबळ, दिल्लीपर्यंतचे वजन व राष्ट्रवादी काँग्रेसची अनुकूल भूमिका पाहता सतेज पाटील यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिले आहे. परंतु, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन सतेज पाटील सोडून कोणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी केल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. कोणालाही उमेदवारी दिली तर बंडखोरी ठरली असल्याने पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परवा चौघा इच्छुकांना मुंबईत बोलावून पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे ठाम राहण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला, याबाबत उत्सुकता ताणली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी सतेज पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना ‘अजिंक्यतारा’ येथे बोलावून विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व नागपूर येथे होणाऱ्या कॉँग्रेसच्या मोर्चाच्या तयारीसाठी काही सूचना केल्याचे समजते. कॉँग्रेसची उमेदवारी आपल्याला जाहीर झाल्यानंतरच अर्ज दाखल करणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. त्यामुळे उमेदवारीची घोषणा होण्यास विलंब होत आहे. - सतेज पाटील, माजी गृहराज्य मंत्री.
चित्र आज स्पष्ट होणार
By admin | Published: December 07, 2015 12:50 AM