सांगली : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत सांगली, कोल्हापूर येथील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकरीही हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी १० हजार भाकरी व खरडा जमविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, दि. २५ रोजी अंकलखोप (ता. पलूस) येथून पाच हजार आणि दि. २६ रोजी नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी पाच हजार भाकरी पाठविणार आहेत.पदयात्रेत सांगली जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले, भास्कर कदम, भरत चौगुले, वैभव चौगुले, संदीप राजोबा, सुदर्शन वाडकर, सचिन डांगे, विनायक जाधव, बाबा सांद्रे, पोपट मोरे, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली पाहिजे, साखरेचे दर वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता ५०० रुपये मिळाला पाहिजे, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी यांसह अन्य मागण्यांसाठी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. सोमवार, दि. २२ पासून पुणे येथून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. बुधवार, दि. २४ रोजी आत्मक्लेश पदयात्रेचा मुक्काम वाकसई (ता. मावळ, जि. पुणे) येथील संत तुकाराम महाराज पादुका वृक्ष येथे होता. गुरूवार, दि. २५ रोजी खोपोली (जि. रायगड) येथे मुक्काम आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत, तर दि. २६ रोजी नांद्रे येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातून, अशा भाकरी आणि खरडा जमविण्याचे नियोजन आहे. पदयात्रेतील कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी दि. ३० तारखेपर्यंत मिरज तालुक्यातील दुधगाव, समडोळी, तुंग, कवठेएकंद, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, मालगाव, बेडग, आरग, म्हैसाळ, पलूस तालुक्यातील शेतकरी रोज भाकरी व खरडा पाठविणार आहेत, असेही महावीर पाटील यांनी सांगितले.पुणे, मुंबईतील सांगलीकर आंदोलनात मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले जे नागरिक पुणे, ठाणे, मुंबई आणि अन्य शहरांच्या परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त राहतात, तेथील हजारो नागरिक शिदोरीसह आंदोलनात बुधवारी सहभागी झाले. कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असल्यामुळे आत्मक्लेश पदयात्रा निश्चितच यशस्वी होणार असून आंदोलनापुढे सरकारला झुकावेच लागेल, असे महावीर पाटील यांनी सांगितले.
आत्मक्लेश यात्रेकरिता दहा हजार भाकरी जाणार
By admin | Published: May 24, 2017 11:40 PM