आजरा : हिरण्यकेशी नदीवर ५३ वर्षांपूर्वी बांधलेल्या साळगाववरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा एक पिलर कोसळला आहे. पिलरचे दगडी बांधकाम कोसळल्याने बंधाऱ्यावरील अजवड वाहनांची वाहतूक बंद केली असल्याचे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एन. डी. मळगेकर यांनी सांगितले.
साळगाव बंधाऱ्यावरून साळगाव, पेरणोली, देवकांडगाव, हरपवडे, कोरीवडे, विनायकवाडी यासह गारगोटीला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. बंधाऱ्याची उंची कमी असल्याने प्रतिवर्षी या बंधाऱ्यावर १५ ते २० दिवस पावसाळ्यात पाणी असते. त्यामुळे वरील गावांना सोहाळे मार्गे प्रवास करावा लागतो. काल बंधाऱ्याच्या आजऱ्याकडील बाजूची चार नंबरच्या पिलरची अधोबाजू (ड्राऊन स्ट्रीम) ही दगडाची बाजू कोसळली आहे.
बंधाऱ्यात पाणी साठविल्याने पाण्याचा दाब आहेच. त्यातच उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर याच बंधाऱ्यावरून वाहतूक करीत आहेत. त्यामुळे सध्या या बंधाऱ्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
----------------------------------
* वारंवार येणारा महापूर, बंधाऱ्यावरील वाढलेली वाहतूक यामुळे बंधाऱ्याचे एक पिलरचे दगडी बांधकाम कोसळले आहे. सध्या बंधाऱ्यात पाणी आहे. फेब्रुवारीअखेर पाणी कमी झाल्यानंतर पिलरचे काँक्रीटचे काम करणार आहे. सध्या वरिष्ठ कार्यालयात दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला आहे. पुढील एक महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. तोपर्यंत बंधाऱ्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद केली आहे.
- एन. डी. मळगेकर, शाखाधिकारी पाटबंधारे विभाग, आजरा.
----------------------------------
* पर्यायी पुलाची प्रतीक्षाच
आमदार प्रकाश आबिटकर यांनी बंधाऱ्याला पर्यायी म्हणून पुलासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी केली आहे. पावसाळ्यात बंधाऱ्यावर पाणी आल्यानंतर पुलाची गरज लक्षात येते. चर्चा होते व थांबते. आता पिलरच कोसळल्याने तातडीने पूल बांधण्याची गरज आहे.
----------------------------------
* फोटो ओळी : साळगाव बंधाऱ्याचा कोसळलेला पिलर. दुसऱ्या छायाचित्रात पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावरून अवजड वाहनास बंदी असल्याचा लावलेला फलक.
क्रमांक : ०९१२२०२०-गड-०४/०५