कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठावरील गावांना काळम्मावाडी धरणाचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे देण्यात यावे, या मागणीसाठी आज चाळीस गावांच्यावतीने आज उपोषण करण्यात आले. यामध्ये सरपंच व ग्रामसेवकांनी भाग घेतला. पंचगंगा नदीकाठावरील ग्रामपंचायत कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. पंचगंगा प्रदूषणामुळे नदीकाठच्या ४० गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील ग्रामीण भागात काविळीची साथ पसरून ४० नागरिक मृत्युमुखी पडले होते. गतवर्षी ३० डिसेंबरच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन या चाळीस गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी भेट घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे निवेदन दिले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ठराव करून पंचगंगा नदीकाठावरील सर्व गावांना थेट लाईनने पाणी देण्याबाबत ठराव करण्यात आला होता. २६ जानेवारी २०१४ च्या ग्रामसभेत सर्व गावांनी तसा ठराव केला होता. परंतु याबाबतचा कोणताच प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला नाही. त्यामुळे आज हे उपोषण करण्यात आले. आज सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी उपोषणकर्त्याना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. संजय पवार यांनी याबाबतच्या मागणीचे निवेदन फॅक्सद्वारे पालकमंत्री पाटील यांना पाठविले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व तिळवणीचे सरसंच व कृती समितीचे निमंत्रक प्रमोद कदम, कबनूरचे सरपंच सुधीर पाटील, साजणीच्या सरपंच सानिया सुतार, हालोंडीचे सरपंच राजाराम कांबळे, अब्दुललाटच्या सरपंच कुसूम परीट, जि.प. सभापती सावकार मादनाईक, शुक्राना मकानदार आदींनी केले. (प्रतिनिधी)
नदीकाठच्या गावांनाही हवी थेट पाईपलाईन
By admin | Published: June 24, 2014 1:13 AM